
मलाक्का सामुद्रधुनीवरील कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात रूपांतरीत झाले आहे. पुढील 24 तासांत अंदमान समुद्रातील हवामान अचानक बदलू शकते. स्कायमेट वेदरने संकेत दिले आहेत की, पुढील 24 ते 48 तासांत सेन्यार चक्रीवादळ जमिनीवर धडकेल. या काळात 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि वादळासह मुसळधार पाऊस पडेल.
मलाक्काप्रमाणेच दक्षिण श्रीलंकेजवळ बंगालच्या खाडीतही कमी दाबाचे क्षेत्र वादळाचे रूप धारण करत आहे. त्यामुळे ओडिसा, पश्चिम बंगाल आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाने 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरदरम्यान दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या वादळामुळे भारतातील दक्षिणेकडील आणि किनारी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि पूर येण्याची शक्यता आहे. तामीळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे, ओडिशा व पश्चिम बंगालच्या किनारी भागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरमध्ये थंडीची लाट व बर्फवृष्टीची शक्यता आहे, ज्याचा परिणाम हरयाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानपासून बिहार आणि मध्य प्रदेशपर्यंत जाणवेल.























































