अमरावती जिल्ह्यातील शाळेत विद्यार्थ्यांची नाममात्र हजेरी, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची लगबग

राज्यशासनाने आजपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले असले तरी मात्र अमरावती जिल्ह्यात शाळेतील विद्यार्थी शाळेत फिरकले नाही. विद्यार्थीच शाळेतच न आल्यामुळे केवळ शिक्षकांनाच शाळेत हजर राहावे लागले. मात्र शिकवणीचा कोणताही वर्ग विद्यार्थी नसल्यामुळे घेता आला नाही. केवळ नाममात्र विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली.

अमरावती जिल्ह्यातील शाळा सुरू होणार असल्यामुळे संबंधित शाळेचे शिक्षक आपापल्या शाळेत पोहोचले. मात्र विद्यार्थी शाळेकडे फिरकलेच नाही त्यामुळे शिक्षकांना शाळेतच बसून विद्यार्थी येण्याची वाट पाहावी लागली. उल्लेखनीय म्हणजे मार्चमध्ये झालेल्या दहावी व बारावीच्या परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा आज पेपर होता. त्यामुळे ज्या शाळेत परिक्षेचे सेंटर होते त्या ठिकाणी काही प्रमाणात विद्यार्थ्यांची लगबग होती.

तसेच अमरावती जिल्ह्यात 39 शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत. ही बाब पालकांना माहित झाल्यामुळे त्यांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. प्रत्येक शिक्षकांची कोरोना तपासणी आवश्यक असल्यामुळे अनेक शिक्षकांस तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात दिसून येत होते. दोन दिवसापासून शिक्षकांची कोरोना तपासणी सुरू होती. परंतु दोन दिवस सुट्ट्या आल्यामुळे अनेक शिक्षक कोरोनाची तपासणी करू शकले नाही. प्रत्यक्षात तपासणी केल्याशिवाय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवू नये असे निर्देश असल्यामुळे अनेक शिक्षक तपासणीसाठी रुग्णालयात होते.

अमरावतीच्या जिल्हाधिकार्‍यांनी आज वेगवेगळ्या शाळेत भेटी शाळेतील शिक्षणाचे कार्य कसे चालू आहे याची पाहणी केली. परंतु त्यांनाही शाळेतील विद्यार्थ्यांचा अभाव दिसून आला. तसेच 80 टक्के पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील बहुतेकच शाळा विद्यार्थीविना ओस पडल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या