गेल्या काही दिवसांपासून रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच रेल्वे रुळावर अवजड वस्तू ठेवून रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्नही अनेकदा करण्यात आला आहे. यात आता आणखी एक भर पडली आहे. उत्तराखंडमध्ये रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील रुरकीजवळील ढंढेरा रेल्वे स्थानकात हा प्रकार उघडकीस आला आहे.
रविवारी सकाळी 6 वाजून 35 मिनिटांनी मालगाडीच्या लोको पायलटने रुरकीच्या स्टेशन मास्टरला लंढौरा आणि ढंढेरा दरम्यान ट्रॅकवर एक सिलिंडर असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पॉईंट्समन तात्काळ घटनास्थळी पोहचला आणि त्याने पाहणी केली असता तेथे रिकामा सिलेंडर आढळून आला. सदर सिलेंडर त्याने ढंढेरा स्टेशन मास्तरकडे सुपूर्द केला, असे उत्तर रेल्वेचे सीपीआरओ हिमांशू उपाध्याय यांनी सांगितले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कानपूरमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला होता. रेल्वे रुळावर एलपीजी सिलिंडर ठेवण्यात आला होता. यावेळी कालिंदी एक्स्प्रेस अपघातातून थोडक्यात बचावली होती.