L&T Mumbai Open 2026 – मननचया सवांगींकवे, लिओलिया जीनजीन यांची आगेकूच; जपानच्या माई यामागूचीचा मानांकित खेळाडूवर विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए १२५के डॉलर महिला टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत एकेरीत गतउपविजेत्या थायलंडच्या मननचया सवांगींकवे, फ्रान्सच्या लिओलिया जीनजीन यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत जपानच्या माई होंतामा हिने रशियाच्या ऍल्व्हेन्टिना इब्राजीमोव्हाचे आव्हान ६-१, ६-४ असे संपुष्टात आणले.

गतउपविजेत्या थायलंडच्या मननचया सवांगींकवेने स्लोव्हाकियाच्या व्हिक्टोरिया मोर्व्हायोवाचा ६-२, ६-१ असा सहज पराभव केला. आघाडीची टेनिसपटू मननचया हिने आपल्या कारकिर्दीत आगेकूच करत जागतिक क्रमवारीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले असून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत देखील ती पात्र ठरली होती. अव्वल मानांकित न्यूझीलंडच्या लुलु सून हिने स्पर्धेतून माघार घेतल्याने, काल पात्रता फेरीत पराभव पत्कराव्या लागणाऱ्या अंकिताला लकी लुझर म्हणून प्रवेश देण्यात आला होता. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या जपानच्या मिसाकी मात्सुदा हिने लकी लुझर ठरलेल्या हिंदुस्थानच्या अंकिता रैनाचा ६-४, ६-० असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

जपानच्या २६ वर्षीय माई यामागूची हिने आठव्या मानांकित रशियाच्या पोलिना इटचेन्कोचा ५-७, ६-३, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. हा सामना २ तास १४ मिनिटे चालला. फ्रान्सच्या तिसऱ्या मानांकित लिओलिया जीनजीन हिने वाईल्ड कार्ड द्वारे मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश केलेल्या हिंदुस्थानच्या दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू वैदेही चौधरीचा ६-२, ६-० असा पराभव करून तिचे आव्हान मोडीत काढले. लिओलिया हिने याआधी २०२२ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा वर विजय मिळवला होता.