
>> शेफ विष्णू मनोहर
उत्तम स्वयंपाकासोबत खाद्यपदार्थांच्या चवीचे बारीक ज्ञान असणे ही एक कला आहे. मधुरा पेठे त्यात अक्षरशः पारंगत आहेत.
फेसबुक, व्हॉट्स ऍप आणि मोबाईलचा काळ आणि त्याआधीचा काळ असे दोन्ही काळ मी अनुभवले आहेत. या दोन्ही काळांची आपली एक वेगळी गंमत आहे. फेसबुक, व्हॉट्स ऍपमुळे विशिष्ट आवडत असलेली मंडळी एकत्र गोळा व्हायला लागली. त्यातल्याच मधुरा पेठे. पदार्थांच्या आवडीमुळे त्यांनी खादाडखाऊ नावाची एक कम्युनिटी फेसबुकवर तयार केली. त्याचे आता जगभरात दोन ते अडीच लाख सदस्य जमले आहेत. स्वयंपाक करणे, त्यावर लिहिणे, बोलणे हे सगळं त्यांच्या आवडीचं. एखादा पदार्थ सापडला तर त्या पदार्थाविषयीची सखोल माहिती मिळवणे आणि लोकांच्या माहिताकरिता फेसबुक पेजवर टाकणे हा त्यांचा आवडता छंद.
अशातूनच त्यांचे खाद्यविषयावरचे सखोल ज्ञान माझ्या लक्षात आले. लंच डेटसाठी वेगळं न जाता मी त्यांच्या बरोबर दोन कुकरी शोचे एपिसोड शूट केले. त्यांना त्यांच्या खाण्याविषयी आवडी विचारल्या, त्या म्हणाल्या मला सगळ्या प्रकारचं जेवण अतिशय प्रिय आहे. पण खरं तर हिंदुस्थानी जेवण सर्वात जास्त प्रिय. एकटय़ा हिंदुस्थानचे इतके पदार्थ आहेत की, उभा जन्मही अपुरा पडेल प्रत्येक गोष्ट चाखून बघायला, त्यातही नॉनव्हेज बिर्याणी आणि तिरामिसू नावाचं इटालियन डेझर्ट विशेष आवडतं. त्या म्हणतात आज जी काही माझी ओळख आहे ती पूर्णपणे खाणं या विषयाशी निगडित आहे. ‘खादाडखाऊ’ हा ग्रुप चालवताना त्यांना त्यांच्या पतीची बरीच मदत असते. परदेशातील एक अनुभव सांगताना त्या एकदा थायलंडला गेल्याचा किस्सा सांगतात. त्यांना मशरुम आवडत असल्यामूळे नवरा नको म्हणत असतानासुद्धा त्यांनी मशरुमचे सुप मागितले. प्रत्यक्षात ते सूप जेव्हा समोर आले तेव्हा त्याच्या वासाने आणि रंगाने विरस झाला. गडद हिरवा रंग आणि शिळ्या कच्च्या माशांचा वास त्यातून येत होता. असे सूप प्यावे की न प्यावे या विचारात असताना नवरा म्हणाला ‘तुला झेपणार नाही दे इकडे’. असे अनेक नवनवीन पदार्थ चाखून पाहण्याच्या नादात माझ्या नवऱयाला मात्र खूप सहन करावं लागतं.
त्या म्हणतात एकदा दुबईत एक खास इराणी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. एक प्रकारचा राईस मागवला तर एक भलामोठा ट्रे भरेल इतका शिग लावून भात आलेला, त्यावर अर्धा किलो मटण शिजवलेलं असंच ठेवलेलं, सोबत रस्सा दिलेला. त्याला चक्क कोल्हापुरी तांबडय़ा रस्स्यासारखी चव होती. तिखट अजिबात नाही व मसाला अगदी तसाच. कोण कुठला वेगळ्याच प्रांतातील देश मात्र तेथील चवीचं आपल्या पदार्थाशी असलेलं साम्य चकित करून गेले.
त्या लहानपणीचा एक किस्सा सांगते. खरं तर स्वतःच रेस्टॉरेंट असावं हे माझं आणि माझ्या बहिणीचं सईचं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. आमची भातुकलीसुद्धा रेस्टॉरंट म्हणूनच खेळली जायची. आजही अनेकदा वाटतं, परंतु मी योग्य वेळेकरता वाट पहात आहे. कधीतरी नक्कीच एक खास खवय्यांना आवडेल असं एखादं रेस्टॉरंट सुरू करायला आवडेल.बोलता-बोलता त्यांनी मला एक वेगळ्या प्रकारचं मॉकटेल तयार करून दिलं आणि आमची लंचडेट संपली.
व्हेज कोल्हापुरी
साहित्य – 2 वाटय़ा बारीक चिरलेल्या भाज्या (फ्लॉवर, गाजर, फ्रेंचबीन्स, बटाटे) , अर्धी वाटी ओली लाल मिरची, पाव वाटी तेल, 1 चमचा शहाजीरे, 5-6 लवंग, 1 चमचा काळीमिरी, 2चमचे बारीक चिरलेला लसूण, 2-3 तमालपत्र, पाव चमचा हळद, मीठ, चवीनुसार लिंबू, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर.
कृती – 2 वाटय़ा भाज्यांचे (फ्लॉवर, गाजर, फ्रेंचबीन्स, बटाटे) बारीक तुकडे करून तळून घ्या. अर्धी वाटी ओली लाल मिरची वाटून पेस्ट करून घ्या. फ्रायपॅनमधे सर्व प्रथम तेल गरम करून त्यात 1 चमचा शहाजीरे, 5-6 लवंग, 1 चमचा काळी, 2 चमचे बारीक चिरलेला लसूण, 2-3 तमालपत्र, हळद घालून परतून त्यात लाल मिरचीचे वाटण घाला. थोडे परतल्यावर त्यात चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालून तळलेल्या भाज्या, कोथिंबीर घाला. 2 मिनिटे मंद आचेवर होऊ द्या. गरम गरम खायला द्या.
लेमोनेड
साहित्य – अर्धी वाटी साखर, 1 कप पाणी, 2 चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा सायट्रिक ऑसिड, 4 चमचे लिंबाच्या सालीचा भाग.
कृती – पाणी उकळून त्यात साखर घाला व लिंबाच्या सालीचा भाग घालून उकळवा. नंतर गाळून त्यात लिंबाचा रस घालून थंड करा. सर्व्ह करतेवेळी ग्लासमध्ये सोडा व सायट्रिक ऑसिड एकत्र करून घाला. वरून हे मिश्रण ओता. सोडा व सायट्रिक ऑसिडमुळे गॅस तयार होईल.
चिकन दम बिर्याणी
साहित्य – साफ केलेले चिकन, 2 वाटय़ा कणकेचा गोळा, 2 वाटय़ा तांदूळ, 4 चमचे खडा मसाला, अर्धी वाटी खसखस, 4 चमचे आले-लसूण पेस्ट, 4 चमचे हिरवी मिरची-कोथिंबीर पेस्ट, चवीनुसार मीठ, लिंबू, हळद, 1 वाटी घट्ट दही, 1 वाटी शिजवलेले मटण.
कृती – सोललेल्या कोंबडीला आले-लसूण पेस्ट, मीठ, लिंबू, हळद लावून ठेवावे. तसेच मीठ लिंबू, हळद लावून मटण शिजवून घ्यावे. त्यात खसखस, खडा मसाला, आले-लसूण पेस्ट व अर्धी वाटी दही घालून बाजूला ठेवावे. साधारण अडीच वाटय़ा पाणी उकळत ठेवून त्यामध्ये थोडा खडा मसाला, दही, मीठ घालून 4 चमचे तूप घालावे. पाणी उकळल्यावर त्यात तांदूळ शिजवावे. भात 80 टक्के शिजल्यावर, मॅरिनेट केलेले मटण त्यावर घालावे. साफ केलेल्या कोंबडीत हा मटणमिश्रित पुलाव दाबून भरावा. त्यावर शिजलेल्या कणकेची पोळी लावून बंद करावे व मंद आचेवर साधारणपणे 50 मिनिटे शिजवावे.


























































