लेखणीने स्वत्त्व गवसले: माधुरी साठे

634

मला प्रथमपासूनच लेख व कविता लिहायची आवड होती. बारावीला असताना जाई नावाची कथा लिहिली आणि सहज एका मासिकाला पाठविली. त्या मासिकात ती लगेच छापून आल्याने मला आनंद झाला. कॉलेजमध्ये असताना साहित्य वर्कशॉपसाठी विद्यार्थी निवडायचे होते, मी दिलेल्या कथा, कवितेवरून मला पण निवडले गेले. वर्कशॉपमध्ये दोन दिवस नामवंत कवी, लेखक यांची नंतर डिग्री व मंत्रालयातील नोकरी याकाळात लेखन बाजूला पडले. नोकरीतून बारा वर्षे आधीच सेवानिवृत्ती घेतली आणि खऱया अर्थाने लेखनासाठी वेळ मिळाला. लेखन व कवितेमुळे मनातले वाचकांपर्यंत पोहचविता आले तसेच विचारांच्या कक्षा रूंदावत गेल्या.

माझा पहिला लेख लोकसत्तामधील वास्तुरंगमध्ये छापून आला आणि अनकांनी त्याचे कौतुक केले. मराठी टायपिंग मी स्वतःच करायला शिकले, अनेक लेख काही कविता माझ्या लेखणीतून उतरत गेल्या. विविध वर्तमानपत्रांना लेख मी इमेलवरून पाठवायला लागले. आत्तापर्यंत सुमारे ५० लेख व काही कविता छापून आल्या आहेत आणि वाचकांनी त्याला भरभरून पसंती दिली आहे. साहित्याच्या या आवडीमुळे माझा वेळही मजेत आणि आनंदात जाते. मला जुनी हिंदी व मराठी गाणी ऐकायलाही खूप आवडतात. कोणाला वाचनाचा, लेखनाचा, चित्रकलेचा, गायनाचा असे नाना प्रकारचे छंद असतात. माणसाला आयुष्यात एकतरी छंद असावा. छंदामुळे माणसाला यशपण प्राप्त होऊ शकते. आयुष्यात ताणतणाव हलके करण्याचे बळ छंद जोपासण्यात आहे. छंदामुळे माणसाच्या जीवन जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो हे नक्की. त्यामुळेच माझ्या जीवनात साहित्याला एक वेगळेच स्थान प्राप्त झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या