
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि तितकीच धाडसी घटना समोर आली आहे. मडवडा पंचायतीतील एका अंगणवाडी केंद्रात मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यापासून 20 मुलांचे प्राण वाचवताना एका अंगणवाडी सेविकेने आपल्या प्राणांची आहुती दिली. कांचनबाई मेघवाल, असे या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंगणवाडी केंद्राच्या आवारात मुले नेहमीप्रमाणे खेळत होती. अचानक मधमाशांच्या एका मोठ्या थव्याने मुलांवर हल्ला चढवला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तिथेच मुलांसाठी मध्यान्ह भोजन बनवणाऱ्या कांचनबाई मेघवाल यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुलांच्या दिशेने धाव घेतली. आपल्या जीवाची पर्वा न करता, त्यांनी जवळच असलेल्या सतरंज्या आणि चटईचा वापर करून एकामागून एक अशा सर्व 20 मुलांना सुरक्षितस्थळी हलवले.
या प्रक्रियेत शेकडो मधमाश्यांनी कांचनबाईंच्या शरीरावर हल्ला केला. मधमाश्यांच्या डंखांमुळे त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या आणि वेदनेने विव्हळत होत्या तरीही सर्व मुले सुरक्षितपणे केंद्राच्या आत जाईपर्यंत त्यांनी हार मानली नाही. मुलांचे रक्षण करण्याच्या जिद्दीपुढे त्यांनी स्वतःच्या वेदनांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. मात्र, सर्व मुलांना सुरक्षित केल्यानंतर त्या जमिनीवर कोसळल्या. घटनेची माहिती मिळताच कॉन्स्टेबल कालुनाथ आणि पायलट राजेश राठोड यांनी त्यांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात नेले, परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कांचनबाईंच्या पश्चात त्यांचा एक मुलगा, दोन मुली आणि अर्धांगवायूने ग्रस्त असलेले पती शिवलाल असा परिवार आहे. त्या कुटुंबाचा मुख्य आधार होत्या. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी कांचनबाईंच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची आणि परिसरातील मधमाशांचे पोळं काढून टाकण्याची मागणी केली आहे. एका गरीब कुटुंबातील महिलेने दाखवलेलं हे धाडस माणुसकीचे सर्वोच्च उदाहरण ठरले आहे.



























































