मध्य प्रदेश – संततधार पावसामुळे घर कोसळलं, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात संततधार पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे नदीनाल्यांना पूर आला असून अनेक घरं जमीनदोस्त झाली आहेत. अशाच प्रकारे एक घर पडून एकाच कुटुंबातील चौघांचा त्याखाली दबून मृत्यू झाला आहे.

रीवा जिल्ह्यातली बहेरा घुचियारी गावातही मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी रात्री येथील रहिवासी असलेल्या मनोज पांडे याचं घर पावसामुळे कोसळलं. त्यात त्याच्या कुटुंबातील पाच जण दबले गेले.

यात त्याची आई केमली देवी (70), मनोज पांडे (27), काजल पांडे (80), अनन्या पांडे (4) यांचा मृत्यू झाला तर मनोजची दुसरी मुलगी आंचल (6) ही गंभीररित्या जखमी आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा लोकांना पावसामुळे काहीही कळू शकलं नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पांडे कुटुंबीयांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं. मात्र, यातील चौघांचा आधीच मृत्यू झाला होता.

रीवा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्घटनेतील बळींच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या