मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून एका अख्ख्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न केवळ दोन रुपये आहे. तहसीलदारांच्या स्वाक्षरीने हे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. या प्रमाणपत्राचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन रुपये कसे असू शकेल, अशी शंका उपस्थित करत अनेक युजर्सनी यावर एकापेक्षा एक भन्नाट कमेंट केल्या आहेत. हे प्रमाणपत्र सागर जिल्ह्यातील बांदा तहसीलमध्ये घोग्रा गावात बलराम चढार यांच्या नावाने आहे. त्यांना जानेवारीमध्ये उत्पन्न प्रमाणपत्र जारी करण्यात आले. या कुटुंबात एपूण पाच सदस्य आहेत. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सर्व कुटुंब मजुरीचे काम करते. बलराम चढर कुटुंबातील सगळ्यात लहान असून त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. पुढे शिक्षणासाठी शिष्यवृत्ती हवी होती. त्यासाठी अर्ज केला, परंतु शिष्यवृत्ती मिळाली नाही. शिष्यवृत्तीबद्दल शिक्षकांकडे विचारणा केली तेव्हा तपासणी केली असता प्रमाणपत्रावरील उत्पन्नाची रक्कम चुकीची असल्याचे त्याच्या लक्षात आले.
– कॉमन सर्व्हिस सेंटरकडून उत्पन्नाचा दाखला तयार करताना बलरामने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 40 हजार रुपये सांगितले होते, परंतु प्रमाणपत्रावर केवळ दोन रुपये इतका उल्लेख आहे. दाखल्यावरील आकडा ना तहसीलदारांनी तपासून पाहिला, ना तो जारी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी. त्यामुळे 40 हजार रुपये असे छापून येण्याऐवजी केवळ दोन रुपये असे छापून आले. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे हे घडले, असे बलराम याने म्हटले.
– ज्या तहसीलदाराच्या स्वाक्षरीने बलरामला वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र जारी झाले आहे, त्या तहसीलदाराची आता बदली झाली आहे. दोन रुपयांचा उल्लेख असलेल्या वार्षिक उत्पन्न दाखल्यावर बांदाचे तत्कालीन तहसीलदार ज्ञानचंद्र राय यांची स्वाक्षरी आहे. 8 जानेवारी 2024 रोजी राय यांनी दाखला जारी केला होता. परंतु त्यानंतर दोन रुपये उल्लेख असलेला उत्पन्नाचा दाखला रद्द करून त्या जागी सध्याचा आकडा म्हणजेच 40 हजार रुपये उत्पन्न असलेला दाखला जारी करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.