ऐकावे ते नवलच! सुरक्षारक्षक श्वानही करतोय श्रावणी सोमवारचा उपवास

हिंदुस्थानच्या संस्कृतीत धार्मिक महत्त्व असणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. यावेळी श्रावणातील दरसोमवारी लोक भगवान शंकराची मनोभावे आराधना करतात. वेगवेगळ्या मंदिरांना भेट देतात. असंच एक मंदिर म्हणजे श्री महाकालेश्वर मंदिर. हे मध्य प्रदेशातील उज्जैन येथील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. बाबा महाकालच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. दरम्यान बाबा महाकालचा एक भक्त उज्जैनमध्ये प्रंचड चर्चेत आहे. हा भक्त दर सोमवारी मंदिरात येतो भगवान शंकरांचे ( बाबा महाकाल) दर्शन घेतो आणि दर सोमवारी उपसाही धरतो. मात्र हा भक्त कोणी माणूस नसून तो एक श्वान (कुत्रा) आहे. खली असे या श्वानाचे नाव आहे.

उजैनमधील श्री महाकालेश्वर मंदिराच्या सुरक्षेसाठी श्वान खलीला काही वर्षांपूर्वी शाजापूर येथून उज्जैन येथे आणण्यात आले होते. महाकाल मंदिरासह इतर ठिकाणची सुरक्षा व्यवस्था पाहणाऱ्या श्वानपथक संघाचाही तो सदस्य आहे. दरम्यान महाकालेश्वर मंदिरात दररोज कर्तव्य बजावण्यासाठी येणारा कुत्रा खली हा बाबा महाकालचा निस्सीम भक्त आहे. तो मंदिरात पोहोचताच आधी महाकालेश्वरांचे दर्शन घेतो आणि आपल्या कामाला सुरुवात करतो. आश्चर्य म्हणजे यावेळी खलीने श्रावणी सोमवारचा उपवास देखील केला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये शाजापूरहून उज्जैनला आलेला श्वान खलीवर सर्व प्रकारच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेला कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणत्याही मोठ्या नेत्याचे आगमन असो, जर्मन शेफर्ड श्वान खली प्रत्येक सुरक्षेचे काम अतिशय चोखपणे पार पाडतो. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी जेव्हा उज्जैनला पोहोचले तेव्हाही खली हा श्वान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला होता. खली हा जर्मन शेफर्ड कुत्रा अवघ्या 4 वर्षांचा आहे. तसेच उपनिरीक्षक महेश शर्मा, कॉन्स्टेबल अनिल, हेड कॉन्स्टेबल विक्रम सिंग आणि कॉन्स्टेबल राहुल आणि महेंद्र यांच्या टीममध्ये श्वान खलीचाही समावेश करण्यात आला आहे.