मद्रास हायकोर्टाच्या माजी न्यायाधीशाला अटक, महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान भोवले

सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व महिला वकिलांबद्दल अपमानास्पद टिप्पणी करून वादात सापडलेले कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सी एस.कर्णन

यांना चेन्नई पोलिसांनी अखेर बुधवारी अटक केली. वादग्रस्त वक्तव्ये करीत खळबळ माजवणारे कर्णन यांच्याविरोधात चेन्नई उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी. एस. कर्णन यांनी महिनाभरापूर्वी उच्च न्यायालयाचे आजी-माजी न्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात अपमानास्पद टीका- टिपण्णी केली होती.27 ऑक्टोबर रोजी चेन्नई पोलिसांच्या सायबर सेलने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

मद्रास हायकोर्टातील एका वकिलाने त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. मद्रास हायकोर्टातील काही वरिष्ठ वकिलांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याकडे कर्णन यांच्याविरोधात एक पत्र लिहिले होते. यामध्ये एका व्हिडिओबाबत भाष्य करण्यात आले आहे. व्हिडिओत कर्णन यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केली आहेत. तसेच न्यायिक अधिकाऱयांना धमकावले आहे. न्यायाधीशांच्या पत्नींनाही बलात्कारांच्या धमक्या दिल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश महिला वकिलांचा व कोर्टातील महिला कर्मचाऱयांचा लैंगिक छळ करतात,असा आरोपही कर्णन यांनी वादग्रस्त व्हिडिओत केला आहे . यामध्ये त्यांनी पीडित महिलांची नावेही घेतली आहेत.हा वादग्रस्त व्हिडिओच माजी न्यायाधीश कर्णन यांच्या अटकेला कारणीभूत ठरला आहे.

माजी न्यायमूर्ती कर्णन यांचे कारनामे

  • 2017 मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना 6 महिने तुरुंगवास
  • 2016 मध्ये कोलकाता उच्च न्यायालयात बदली झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून वरिष्ठ न्यायमूर्तींवर लावले भ्रष्टाचारांचे आरोप
  • गेल्या वर्षी अँटी करप्शन डायनेमिक पार्टीच्या बॅनरखाली लोकसभा निवडणूक लढवली.या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागला.

‘असंसदीय आणि अश्लील भाषा वापरणारे माजी न्यायमूर्ती सी एस कर्णन हे आपल्या वर्तनाने न्यायव्यवस्थेपुढील मोठे संकट ठरत आहेत.न्यायाधीश असताना त्यांनी 2017 मध्ये तुरुंगाची हवा खाल्ली आहे. एका व्हिडिओत त्यांनी महिला आणि न्यायाधीशांबाबत केलेली टिपण्णी त्यांच्यासारख्या उच्च पदस्थाला शोभणारी नाहीय.त्यांचा हा वादग्रस्त व्हिडिओच त्यांच्या शिक्षेसाठी सज्जड पुरावा ठरू शकतो.’ – मद्रास उच्च न्यायालय बार असोसिएशन

आपली प्रतिक्रिया द्या