निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधा! शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सल्ला

693

महाविकास आघाडीचे सरकार अधिक भक्कमपणे चालकण्यासाठी सगळ्यांनी समन्वय ठेवण्याची गरज आहे. सरकारमध्ये मतभेद होतील अशी वक्तव्ये टाळा. मंत्र्यांनी निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधावा, अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळेदेखील या बैठकीला उपस्थित होत्या. या बैठकीत एनआयए, एनपीआर, एनआरसी, आगामी जिल्हा परिषद निवडणुका अशा विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. या वेळी शरद पवार यांनी पक्षातील मंत्री तसेच नेत्यांना समन्वय साधण्याचा सल्ला दिला. जनतेची कामे तातडीने व्हावीत यासाठी मंत्र्यांनी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे आठवडय़ातून तीन दिवस मंत्रालयात बसावे, अशा सूचना मंत्र्यांना दिल्या. ज्या जिल्हय़ात पक्षाचा पालक मंत्री नाही तिथे संपर्व मंत्री नेमण्यात येणार आहे. महामंडळावर नियुक्त्या करताना जिल्हा कार्यकारिणीकडून येणाऱया नावांचाच विचार करण्यात येईल, असेही या वेळी सांगण्यात आले.

एनपीआरबाबत तिन्ही पक्ष निर्णय घेतील

एनपीआर हे डाटा कलेक्शन आहे. ते आधारच्या माध्यमातून झालेले आहे. एनपीआर म्हणजे जे सेन्सेस आहे त्यामध्ये अतिरिक्त प्रश्नावली केंद्र सरकारने टाकलेली आहे. त्या बाबतीत इतर राज्यांनी कोणती भूमिका घेतली आहे. त्या बाबतीत काही माहिती नाही मात्र आमच्या राज्यात तिन्ही पक्ष बसून कुठली प्रश्नावली टाकावयाची आहे याबाबत तिन्ही पक्ष निर्णय घेणार आहेत.

आगामी निवडणुका महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र लढणार

येत्या वर्षभरात जिल्हा परिषदा तसेच इतर निवडणुका येणार आहेत. त्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून कशा लढता येतील यावरही बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या तसेच काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील मुद्दय़ांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे होती त्यावरदेखील बैठकीत चर्चा झाली असल्याचे नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले. एनपीआरचे डेटा कलेक्शन आधारच्या माध्यमातून झाले आहे. एनपीआर म्हणजे जी जनगणना होणार आहे त्याची अतिरिक्त प्रश्नावली केंद्राने टाकली आहे. आपल्या राज्यात प्रश्नावली कोणती टाकायची याचा सरकारमधील तिन्ही पक्ष बसून विचार करतील, असेही नवाब मलिक या वेळी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या