महाविकास आघाडीचा रिमोट माझ्या हातात नाही

महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात नाही. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. सरकार स्थापनेआधी आम्ही सर्व चाचपडून पाहिलं आणि सरकारच नेतृत्व शिवसेनेकडे जावं यावर सर्वांच एकमत झाल्याचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.

एका वृत्त वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामाबाबत भूमिका स्पष्ट केली.
तीन पक्षांचं आघाडी सरकार म्हटल की नाराजी आणि अस्वस्था असणारच. राज्य चालवताना काही इच्छा असतात, त्या आघाडी सरकारमध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात असे नाही म्हणून काही जण अस्वस्थ असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन चांगले काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सरकारला चिंता करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांची गरज मंत्रालयात

अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांची फिल्डपेक्षा मंत्रालयात गरज आहे. अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांना फिल्डवर काम करण्याची जबाबदारी दिल्याचे त्यांनी सांगितले.

राममंदिर भूमिपूजनाला जाणार नाही

राम मंदिराबाबत सध्या कोणताही वाद नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद मिटला आहे. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी निमंत्रण मिळालं तरी जाणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी केले स्पष्ट, कुणालाही निवडणूक नको

सध्या नवीन पर्याय नसल्याने हे सरकार 5 वर्ष चालणार आहे. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच अस्वस्थ आहेत. त्यांना सरकार पाडण्याची घाई आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता कुणालाही निवडणूक नकोत, असे पवार म्हणाले. भाजपला लोकशाही विचार पचत नाही, असं दिसतंय, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्र्यांनी थोडे फिरलेही पाहिजे!

राज्य सरकारमध्ये धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत आहेत. निर्णय घेताना विशेषतः सर्व सहकाऱ्यांना ते विश्वासात घेतात. उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण त्यांनी थोडं फिरलंही पाहिजे, असे पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या