शेतकर्यांनी प्रक्रिया केलेला शेतमाल ऑनलाइन पद्धतीने विक्री करता यावा यासाठी महाराष्ट्र कृषी-उद्योग विकास महामंडळाकडून विकसित केलेल्या महाअॅग्रोमार्ट ई-पोर्टलचा शेतकरी, महिला बचत गट अंध व अपंग महामंडळ, प्रिझन इत्यादींना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी-उद्योग महामंडळाच्या या उपक्रमास स्कॉच पुरस्कार देण्यात आला.
दिल्ली येथे पार पडलेल्या ९९ व्या राष्ट्रीय स्कॉच पुरस्कार सोहळ्यात महामंडळाच्या महाअॅग्रोमार्ट ई-कॉमर्स पोर्टलला हिंदुस्थानातील सर्वोच्च राष्ट्रीय नागरी पुरस्कारांपैकी एक मानाचा स्कॉच पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. महाअॅग्रोमार्ट ई-पोर्टल हे संपूर्ण देशात शेतकरी व शेतीसंलग्न व्यवसायाचे एकाच छताखाली खरेदी व विक्री करण्यासाठीचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म असल्याने हा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याने स्कॉच समूहाचे संस्थापक, समीर कोचर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. याप्रसंगी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाव्यवस्थापक सुजित पाटील व व्यवस्थापक किशोर राठोड यांनी हा पुरस्कार महामंडळाच्या वतीने स्वीकारला.
शेतकर्यांनी पिकविलेला शेतीमाल विक्री करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. दर्जेदार शेतीमाल असतानाही अपेक्षित मोबदला मिळत नाही. ही समस्या ओळखून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने महाअॅग्रोमार्ट हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. या अॅपच्या माध्यमातून शेतकर्यांना शेतीशी संबंधित उत्पादने व इतर कृषीनिविष्ठा सुद्धा खरेदी करता येतात. यामुळे शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, व्यावसायिक आणि उत्पादकांना याचा फायदा होत आहे.