मुसळधार पावसात शिवसैनिकांनी महाबळेश्वर-पाचगणी मार्ग रोखला, रस्त्यांच्या निकृष्ट कामाचा निषेध

महाबळेश्वर ते मेटगुताड दरम्यान राज्यमार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लिंगमळा येथे मुसळधार पावसात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. या आंदोलनामुळे महाबळेश्वर-पाचगणी मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

एप्रिल-मे महिन्यांत पाचगणी ते कुंभरोशी या 38 कि.मी. डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. यापैकी महाबळेश्वर ते मेटगुताड या दरम्यानचे काम महाबळेश्वर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेले असून, रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांच्या नेतृत्वाखाली भरपावसात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, यशवंत घाडगे, नंदकुमार घाडगे उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मिंधे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

सार्वजनिक बांधकामचे उपविभागीय अभियंता अजय देशपांडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने भरून घेतले जातील. तसेच पाऊस उघडताच रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, ज्या ठेकेदाराने या रस्त्याचे काम केले आहे. त्याला काळय़ा यादीत टाकावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे यांनी केली. याबाबत बांधकाम विभागाने सकारात्मक भूमिका घेतल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

जिल्हा संघटक सुधीर राऊत, जिल्हा संघटिका राजश्री भिसे, सुजाता मोरे, लक्ष्मी मालुसरे, तालुकाप्रमुख सागर रायते, खंडाळा तालुकाप्रमुख सागर कदम, प्रणव सावंत, रूपेश वंजारी, हरीभाऊ पवार, रवींद्र भणगे, शहरप्रमुख महेशभाऊ गुजर, शरद बावलेकर, अभिषेक शिंदे, आकाश साळुंखे, उस्मानभाई खारखंडे, राजेश पंडित, राजेश साळवी, दीपक ताथवडेकर, गोपाळ लालबेग, जितेश कुंभारदरे, शिल्पा ठक्कर, वंदना बगाडे आदी उपस्थित होते.