चार वर्षांचा मोहम्मद 18 तासांनंतर ढिगाऱ्याखाली जिवंत सापडला!

काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पत्त्यांप्रमाणे सोमवारी कोसळल्यानंतर आज दिवसभर ढिगारे उपासण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. एनडीआरएफची टीम सर्वस्व पणाला लावून हे काम करीत असतानाच दुपारी एकच्या सुमारास महाडवासीयांना `देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय आला. तब्बल १८ तासांनंतर चार वर्षांचा चिमुकला मोहम्मद बांगी ढिगाNयाखाली जिवंत सापडला आणि बचावकार्यात गुंतलेल्या जवानांनी ‘गणपती बाप्पा मोरया…’ असा एकच गजर केला. महाडकरांनीही टाळ्यांचा कडकडाट करीत एनडीआरएफच्या टीमचे अभिनंदन केले. आश्चर्य म्हणजे रात्रभर ढिगाऱ्याखाली दबूनही मोहम्मदला फक्त किरकोळ खरचटण्यापलीकडे काहीही इजा झालेली नाही. दरम्यान, संपूर्ण रायगड जिल्ह्याला हादरवणाऱ्या `तारिक गार्डन’ दुर्घटनेत 12 जणांचे बळी गेले असून याप्रकरणी बिल्डर, माजी मुख्याधिकारी, अभियंत्यांसह पाचजणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अजूनही दहाजण ढिगाऱ्याखाली दबले असण्याची भीती व्यक्त होत असून बचावकार्य सुरू आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख, जखमींना 50 हजार

महाडमधील इमारत दुर्घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उद्या बुधवारी बैठक होणार असून त्यात अधिक मदत देण्याबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, तर जखमींना वाऱ्यावर सोडणार नसून त्यांना अधिकाधिक चांगली आरोग्य सुविधा देणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

65 वर्षांच्या मेहरुन्निसा आजी 26 तासानंतर जिवंत परतल्या

इमारत कोसळल्याच्या तब्बल 26 तासांनंतर मंगळवारी रात्री 8 वाजता एनडीआरएफ टीम ला ढिगाऱ्याखाली कण्हण्याचा आवाज आला, त्यांनी लोखंडी शिंगांची भेंडोळी कापत मलबा दूर केला तेव्हा त्यांना एक वृध्दा हालचाल करत असल्याचे दिसले, जवानांनी त्यांना सुखरूपपणे ढिगाऱ्यातून बाहेर काढले. मेहरुन्निसा अब्दुल काझी (65)असे या आजींचे नाव आहे. त्यांचे पती अब्दुल काझी (75) यांचा शोध लागलेला नाही

मृतांची नावे

अदी हसीम शेखनाग, नौसिन बांगी, मतीन मुकादम, नाविद झमाने, सय्यद हमीद समीर, फातिमा अन्सारी, इसमत शेखनाग, फातिमा अलसुरकर, शौकत अलसुरकर , अतमश बल्लारी (17), रुकय्या नौसिन बांगी (7), आयशा नौसिन बांगी (2).

आपली प्रतिक्रिया द्या