महाडमध्ये एनडीआरएफच्या बेस कॅम्पसाठी दोन हेक्टर जागा, राज्य सरकारचा मोठा निर्णय

कोकण किनारपट्टी व आसपासच्या भागावरील भविष्यातील नैसर्गिक आपत्तीचे संकट लक्षात घेऊन एनडीआरएफच्या बेस कॅम्पसाठी महाडमध्ये कायमस्वरूपी जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाडमधील दोन हेक्टरहून अधिक जागेवर एनडीआरएफचा कायमस्वरूपी सुसज्ज तळ उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

मागील काही काळापासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्याला नैसर्गिक आपत्तीला अनेकदा सामोरे जावे लागले आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळ, ‘तौकते’ वादळ, महाडमधील तारिक गार्डन इमारत कोसळून भीषण दुर्घटना झाली होती आणि आताचा प्रलयकारी पुराचा तडाखा. या सर्व पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन व मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला (एनडीआरएफ) रायगड जिह्यात कायमस्वरूपी जागा देण्याची मागणी पुढे आली होती. आपत्तीच्या काळात जलदगतीने आपत्तीग्रस्तांना मदत मिळावी यासाठी रायगड जिह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अभय यावलकर यांच्यासोबत अलीकडेच बैठक घेतली. महाड येथे एनडीआरएफचे पथक कार्यरत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महाडमध्ये एनडीआरएफचा कायमस्वरूपी तळ उभारण्याच्या दृष्टीने आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर येथील शासकीय दूध योजनेची 2 हेक्टरहून अधिक जागा एनडीआरएफच्या या बेस पॅम्पसाठी देण्याचा निर्णय राज्याच्या दुग्ध व्यवसाय विभागाने घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या