महालयाचे 15 दिवस, कोरोना काळात प्राण गमावलेल्यांसाठी…

>> दाजीशास्त्री पणशीकर

देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण…ही चार ऋणे हिंदू शास्त्रात सांगितली आहेत. पितृऋण फेडणे म्हणजे पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना संतोष होईल असे करणे.

पितर म्हणजेच आपले पूर्वज, निकटवर्तीय. यांचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय व्हावा यासाठी श्राद्ध करणे हा संस्कार सांगितला आहे. सध्या आपण सगळेच कोरोनासारख्या महामारीचा सामना करत आहोत. अशावेळी गुरुजी-पुरोहितांना घरी बोलावून श्राद्ध करणे शक्य होत नाही. कारण प्रवास करणेही टाळले जात आहे. शिवाय श्राद्धासाठी लागणाऱया भाज्या एकतर खूप महाग किंवा बाजारात मिळतच नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोरोना महामारीत ज्यांना आपले प्राण गमवावे लागले. अशा काही जणांचे फक्त अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यांचं दहावं, बारावंही झालेलं नाही.

जेव्हा गुरुजींना घरी न बोलावता महालय श्राद्ध करणे शक्य नसते तसेच
जेव्हा चांगल्या गोष्टी करण्यासाठी काळ अनुकूल नसतो तेव्हा काय करायला हवे. याविषयीचे मार्गदर्शनही आपल्या हिंदू धर्मशास्त्रात केले आहे. यावरून हिंदू धर्माची महानता सिद्ध होते.
कोरोना महामारीच्या काळात शास्त्र विधानानुसार पुढील श्राद्धविधी करा!

गुरुजींना घरी बोलावणे शक्य नसेल तर गाईला पाव किलो किंवा अर्धा किलोचा शिजलेला भात खाऊ घालायचा. एका ताटात पत्रावळी ठेवून त्यावर भात वाढायचा. भाताचा ढिग डोंगराप्रमाणे करायचा. त्यावर गुळाची ढेप ठेवायची. दुपारी 12 ते 2च्यादरम्यान तो भात गाईला खाऊ घालायचा. ही वेळ पितरांची आहे. द्वादशी किंवा चतुर्दशीच्या दिवशीही हा उपाय करता येईल. गोग्रासामध्ये श्राद्ध केल्याचं फळ मिळतं. तसेच ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे श्राद्ध करणे जमत नसल्यास ते अशा पद्धतीने गोग्रास देऊ शकतात.

z तांदूळ नाहीत, गाय नाही असे चटावरचं श्राद्ध करतात.
z अत्यंत दारिद्रय़ किंवा गरिबी असेल त्यांनी सरोवर किंवा नदीच्या काठावर जाऊन आणि पूर्ण हात वर करून पूर्वजांना सांगायचं की काखेत लपवण्याकरितासुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे माझ्या नमस्काराचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करा. असं केलं की श्राद्ध केल्याचं फळ मिळतं.

z घरात अशांतता, कलह, रोगराई असली की द्वादशी किवा चतुर्दशीला गाईला घास द्यावा.
z आमश्राद्ध करावे. आपल्या क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तेल, तूप, साखर, बटाटे, नारळ, 1 सुपारी, 2 विडय़ाची पाने, 1 नाणे हे साहित्य ताटात ठेवून आमान्नस्थित श्री महाविष्णवे नमः हा नाममंत्र म्हणत त्यावर गंध, फूल, अक्षता आणि तुळशीचे पान वाहावे. हे साहित्य वेदपाठशाळा, गोशाळा अथवा देवस्थान यांना द्यावे.
z चपला, छत्री, वस्त्र अशा वस्तूही स्वेच्छेने दान करता येऊ शकतात.

कोरोना सेंटर्स
z आर. आर. हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर, पेंढारकर कॉलेजजवळ, वैभवनगरी, डोंबिवली (पूर्व) डॉ. अमिर कुरेशी 9323206062
z साई आरोग्यधाम , मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ऍण्ड आयसीयू, दुर्गाडी नाका, डंम्पिंग ग्रांऊडशेजारी, कल्याण (पश्चिम) डॉ. सचिन यादव 8691006291
z साई हॉस्पिटल, 2रा, 3रा आणि चौथा मजला, सर्व्हे 66, वैभव नगरी, काटई, डोंबिवली( पूर्व) डॉ. सुशील झोपे 8448444250

चौकट
सध्या कोणतेही कर्म करायला अनुकूलता नाही. अशावेळी काहीच करू नये. ज्यावेळी कोरोना, लॉकडाऊन संपेल. सगळे व्यवहार पुन्हा सुरळीत होतील तेव्हा दहावं, अकरावं, बारावं, तेरावं करावं. हे विधी केल्यावर वर्ष पूर्ण होत असेल तर वर्षश्राद्धही करावं. कारण कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. अशा काळात जिवंत राहणं महत्त्वाचं आहे. कोरोना महामारीमुळे सद्यस्थितीत पालट होऊन ती पूर्वपदावर आल्यास विधिपूर्वक पिंडदान करून श्राद्ध करावे.

आपली प्रतिक्रिया द्या