श्रीसमर्थ सेवा मंडळाचे प्रमुख कार्यवाह मारुती बुवा रामदासी यांचे निधन

1574

प.पु. श्रीधर स्वामींचे अनुग्रहीत आणि सज्जनगड येथील श्रीसमर्थ सेवा मंडळाचे प्रमुख कार्यवाह समर्थ भक्त मारुतीबुवा रामदासी यांचे सज्जनगडमध्ये शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. अंत्यदर्शनासाठी पार्थिव रविवारी सकाळी 7.30 ते 11.00 वाजेपर्यंत साताऱ्यातील समर्थ सदनमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी 11.30 वाजता सातारा येथील संगम माहुली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मारुती बुवा यांचा जन्म 1936 साली कोल्हापूरच्या ‘बुवाचे वठार’ या गावी झाला होता. ते 14-15 वर्षांचे असताना घर सोडून श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवा व तप करण्यास गेले असता तेथे त्यांची भेट श्री लक्ष्मी नारायण (धारेश्वरचे श्री नर्मदानंद स्वामी) यांच्याशी झाली. काही दिवसानंतर 1950-51 च्या सुमारास ते दोघे श्रीक्षेत्र सज्जनगडला येऊन पोहोचले. तेथे त्यांना श्री स्वामींचे दर्शन झाले आणि अनुग्रहही झाला. त्यानंतर श्री मारुती बुवांनी कधीही सज्जनगड सोडला नाही. ते मागील 33 वर्षांपासून श्री समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख कार्यवाह होते. त्यांनी श्रीमद् दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम यावर खूप लिखाण केले आहे. त्यांनी श्री स्वामींचे चरित्रही लिहिले आहे. सार्थ आत्माराम, मनोबोधाचा अभ्यास, दासबोध चिंतनिका, दासबोधातील रहस्य, आत्मारामातील रहस्य व श्री श्रीधर स्वामी चरित्र ही त्यांची काही ग्रंथसंपदा आहे. शेवटची 3-4 वर्षे त्यांच्या मुक्काम सातारा येथील श्री समर्थ सदनमध्ये होता.

आपली प्रतिक्रिया द्या