
आरे डेअरीला आता महानंद डेअरीची जोड मिळणार आहे. आरे डेअरीकडून मुंबईत वितरीत केली जाणारी सर्व उत्पादने महानंद डेअरीकडून तयार करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा आरे डेअरीबरोबरच आर्थिक अडचणीत असलेल्या महानंद डेअरीला मोठा फायदा होणार आहे.
शेतकऱयांकडून खरेदी केल्या जाणाऱया दुधाला द्यावा लागणारा जादा दर आणि प्रक्रिया, पॅकिंगसह इतर खर्च जादा असल्याने गेल्या दीड-दोन वर्षांपासून महानंद डेअरी आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच लॉकडाऊन काळात शेतकऱयांच्या दुधाला मागणी कमी असतानाही महानंद डेअरीने राज्य शासनाच्या निर्देशानुसार दररोज दहा लाख लिटर दुधाची पावडर तयार केल्याने शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याची दखल घेत राज्य सरकारने महानंदला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरे डेअरीचे मुंबईत सातशेहून अधिक स्टॉल आहेत. तेथे आरे ब्रँडच्या ज्या दुग्ध उत्पादनांची विक्री केली जाते ते सर्व महानंद डेअरीमध्ये तयार करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये आरे तूप, आरे पनीर, आरे श्रीखंड, आरे दही, आरे एनर्जी, आरे लस्सी, दीर्घकाळ टिकणारे आरे गाईचे दूध अशी 16 उत्पादने तयार केली जाणार असल्याचे महानंद डेअरीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्या माध्यमातून महानंदला चांगले उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरेचे बंद पडलेले 64 स्टॉल महानंदला मिळणार
मुंबईत असलेल्या आरेच्या स्टॉलवर आरेच्या उत्पादनांबरोबरच यापुढे महानंदची उत्पादने विक्री केली जाणार आहेत. तसेच मुंबईतील बंद पडलेले आरेचे 64 स्टॉल महानंदला चालवण्यास देण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे महानंदच्या उत्पादनांची विक्री वाढण्यास मदत होणार आहे.


























































