दुधाच्या तपासणीसाठी ‘महानंद’ डेअरी उभारणार अत्याधुनिक लॅब

426

ग्राहकांना चांगल्या प्रतीचे दूध मिळावे म्हणून ‘महानंद’ डेअरीने कंबर कसली आहे. दुधामध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत हे सहजपणे शोधता यावे म्हणून महानंद डेअरी केंद्र सरकारच्या नॅशनल ऍक्रीडिटेक्शन बोर्ड फॉर टेस्टिंग ऍण्ड कॅलिब्रेशन लॅबरोटरीज (एनएबीएल) या संस्थेने प्रमाणित केलेली अत्याधुनिक लॅब उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केवळ दहा-पंधरा मिनिटांत दुधाच्या सर्व चाचण्या होणार असल्याने भेसळीला चाप बसणार आहे.

राज्यात मोठय़ा प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते, मात्र दुभत्या जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यातील, औषधातील घटक दुधामध्ये उतरतात. त्यापैकी काही घटक आरोग्याला चांगले असतात तर काही घटकांचे प्रमाण वाढल्यास त्याचा विपरीत परिणाम होतो. आतापर्यंत राज्यभरातून टँकरनी आलेल्या दुधाची तपासणी करायला तीन-चार तासांचा वेळ जायचा तर काही तपासण्या बाहेरील लॅबमधून केल्या जात होत्या. मात्र आता महानंद स्वतःच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय डेअरी विकास कार्यक्रमांतर्गत (एनपीडीडी)लॅब उभारणार आहे. त्यामुळे कमी वेळात सर्व चाचण्या डेअरीत होणार आहेत. तसेच इतर दूध संघांनाही येथे दुधाची तपासणी करता येणार आहे. दुधाच्या तपासणीसाठी उभारण्यात येणाऱ्या एनएबीएल प्रमाणित लॅबसाठी सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

एनपीडीडीच्या सहकार्याने उभारण्यात येणारी ही लॅब राज्यातील दूध संघ, संस्थांना दूध व दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच कमी वेळेत अत्याधुनिक पद्धतीने दुधाची तपासणी शक्य होईल- शिवाजी पहिनकर, एमडी, महानंद डेअरी

आपली प्रतिक्रिया द्या