सहावीच्या विद्यार्थीनीला घेऊन शिक्षक फरार; बिहार ते नेपाळपर्यंत शोध सुरू

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराजगंज येथे गुरू शिष्याच्या नात्याला कलंक लावणारी घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला घेऊन फरार झाला आहे. विद्यार्थीनीचे वय 15 वर्षांखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरूद्ध एफआयआर नोंदवला असून त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा पोलीस स्थानक हद्दीतील मुलींच्या पूर्व माध्यमिक शाळेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 8 फेब्रुवारी रोजी सहावीची विद्यार्थीनी नेहमीप्रमाणे घरून शाळेत गेली होती. मात्र शाळा सुटल्यानंतर ती घरी परतली नाही. मुलगी शाळेतून घरी न परतल्याने कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर कुटुंबीयांनी मुलगी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. तपासा दरम्यान त्याच दिवसापासून शाळेतील 45 वर्षीय शिक्षकही फरार असल्याचे समजले. पोलिसांनी घटनेचा एकूण क्रम पहाता गैरहजर असलेल्या शिक्षकाविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संशयीत आरोपी शिक्षक नेपाळचा रहिवासी असल्याची माहिती मिळाल्याने नेपाळ ते बिहारमधील अनेक शहरांमध्ये दोघांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.