लोकसभेत महागलेली शाकाहारी-मांसाहारी थाळी विधानसभा निवडणुकीत स्वस्त!

999

दुर्गेश आखाडे । रत्नागिरी

लोकसभा निवडणुकीत शाकाहारी आणि मांसाहारी थाळीचे गगनाला भिडलेले निवडणूक आयोगाचे दर विधानसभा निवडणुकीत खाली उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत 100 रुपये असलेली शाकाहारी थाळी विधानसभा निवडणुकीत 60 रुपये तर अडीचशे रुपयांची चिकन थाळी 120 रुपये झाली आहे.

निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे काम खर्च सनियंत्रण समिती करते. प्रत्येक वस्तूचा एक दर निश्चित केला जातो. हा निश्चित केलेल्या दराप्रमाणे उमेदवाराला निवडणुकीतील खर्चाचा हिशोब द्यावा लागतो. स्थानिक पातळीवर हे दरपत्रक निश्चित होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात जेवणाचे दर पहिल्यावर थ्री स्टार हॉटेलात जेवल्याची अनुभूती देणारे होते.

लोकसभा निवडणुकीत शाकाहारी साधी थाळी 100 रुपये आणि स्पेशल थाळी 150 रुपये होती.विधानसभा निवडणुकीत शाकाहारी थाळी स्वस्त झाली आहे. शाकाहारी थाळीसाठी उमेदवाराला 60 रुपये मोजावे लागणार आहेत.लोकसभा निवडणुकीतील चिकन थाळीचे दर निम्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीत चिकन थाळीसाठी अडीचशे रुपये मोजावे लागत होते. विधानसभा निवडणुकीत तीच चिकन थाळी 120 रुपये आहे. निवडणुकीत डोक्यावर रूबाबदार फेट्यासाठी 120 रुपये मोजावे लागतील,लोकसभा निवडणुकीत फेट्यासाठी दीडशे रुपये मोजावे लागत होते.

आपली प्रतिक्रिया द्या