छोट्याशा चुकीने मतदान हुकलं असतं, दुरुस्ती करत मिळवून दिला मतदानाचा हक्क

771
voting

#MahaElection 2019 नाशिकमधील जूना सिडको येथे मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या एका व्यक्तीचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याची माहिती केंद्रातील अधिकाऱ्याने दिली. त्याच्या नावासमोर मतदान झाल्याची खूण असल्याने गोंधळ उडाला. केंद्र अधिकाऱ्यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने तपास केला. त्यावेळी या व्यक्तीच्या नावासमोरील रकान्यात चुकीने खूण झाल्याचे समोर आले. अखेर योग्य त्या प्रक्रियेद्वारे संबंधित व्यक्तीला पुन्हा मतदानाचा अधिकार मिळाल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील जूना सिडको विभागात हा प्रकार घडला आहे. नाशिकमधील अचानक चौक येथील महानगर पालिका शाळा क्र. 68 येथे मतदान करण्यासाठी पोहोचल्या या व्यक्तीच्या नावा समोरील रकान्यात आधीच कुणीतरी मतदान केल्याचे समोर आले. यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र यासंदर्भात नागरिकांनी तक्रार केली असता तुम्ही गोंधळ करू नका, काळजी करू नका, तुमचे मतदान करून घेऊ, असे उत्तर उपस्थित अधिकाऱ्याने दिले. चूक कुठे झाली ते तपासून नंतर तत्काळ ती दुरुस्त करून संबंधित व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावता आला. चूक दुरुस्त करून मतदान करण्याचा अधिकार दिल्याबद्दल संबंधित कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.

बोगस मतदान झाल्याचे कळाल्यास खऱ्या व्यक्तीला मतदाना करता येते का?

बोगस मतदान झाल्याचं लक्षात आल्यास तुम्ही संबंधित केंद्र अधिकाऱ्यांकडे तक्रार करून त्याची माहिती देऊ शकतात. जर तुमची ओळख योग्यप्रकारे सर्व ओळखपत्रांद्वारे पटवून देण्यात आली तर ‘टेंडर बॅलेट’द्वारे मतदान केंद्रावरील केंद्र अधिकारी खऱ्या व्यक्तीचे नव्याने मतदान करून घेतो आणि आधीच बोगस मतदान बाद केले जाते. त्यामुळे असा प्रकार लक्षात आल्यास गोंधळून न जाता तातडीने तक्रार करून आपली ओळख पटवून द्या आणि ‘टेंडर बॅलेट’द्वारे योग्य मतदान करून आपला हक्क बजावावा.

आपली प्रतिक्रिया द्या