विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे

निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुचनेनुसार हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणूकीची सर्व पुर्वतयारी पूर्ण झाली असून भयमुक्त व पारदर्शीपणे निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.

विविध राजकीय पक्षासोबतच प्रशासकीय पातळीवर देखील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीची जोरदार तयारी सुरु आहे. हिंगोलीचे उपजिल्हाधिकारी हे हिंगोली विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राहणार आहेत. मतदारांपर्यंत जनजागृती व्हावी व प्रसार माध्यमांना आवश्यक माहिती मिळण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करणे, छानणीनंतरची यादी चिन्हवाटप अशी माहिती सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिली जाईल, असे सांगून चोरमारे म्हणाले की, हिंगोली विधानसभा क्षेत्राला वाशीम, परभणी या जिल्ह्यांची हद्द असून तीन ठिकाणी तपासणी पथक राहणार आहेत. तसेच लगतच्या तालुक्याच्या हद्दीवरही तपासणी पथके तैनात केली जाणार आहेत. व्हिडीओ चित्रीकरण करणारे पथकही सक्रिय राहणार असून विविध पक्षाच्या जाहीर सभा, बैठकांचे चित्रीकरण झाल्यावर  काटेकोरपणे खर्चाचा तपशील देण्यात आला आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. एकाच ठिकाणावरुन परवानगी देण्याचेही नियोजन केले जाणार असून उमेदवार व राजकीय पक्षांसाठी याचा लाभ होऊ शकतो. तसेच मतदारापर्यंत जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर देखील भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या