नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात कोल्हापूर जिल्हा मतदानाच्या टक्केवारीत आघाडीवर राहिला. त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणुकीतही शंभर टक्के मतदान तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर नोडल अधिकाऱयांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘‘मागील लोकसभा निवडणुकीचा अनुभव सोबत घेऊन कोणकोणत्या स्तरावर अडचणी आल्या, त्या सोडवून सर्व निवडणूक अधिकारी यांच्या समन्वयाने आदर्श आचारसंहितेचे पालन, मतदार जनजागृती, कायदा व सुव्यवस्थेचे योग्य पालन होईल याची खात्री करा. मतदार याद्या अंतिम करण्यापासून ते प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत मतदारांच्या अडचणी सोडविल्या जातील याविषयी लक्ष द्या,’’ असे त्यांनी सांगितले.
यावेळी मतदार जनजागृती, ईव्हीएम मागणी व प्राथमिक तपासणी, ईव्हीएम विधानसभा मतदार संघांना वाटप करणे, स्ट्रॉगरूम व्यवस्थापन, मतमोजणी केंद्रे व्यवस्थापन, बॅलेट पेपर, पोस्टल, गृहमतदान, मतदार याद्या यासंदर्भात सर्व सूचना दिल्या.
नवीन मतदारांना 19 ऑक्टोबरपर्यंत नोंदणीची संधी
कोल्हापूर जिह्यात सध्या 32 लाख 74 हजार 558 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष 16 लाख 56 हजार 274 व महिला 16 लाख 18 हजार 101 मतदार आहेत, तर तृथीयपंथी मतदार 183 आहेत. 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 72 हजार 566 असून, सैनिकी मतदारांची संख्या 8 हजार 636 आहेत. दिव्यांग मतदारांची संख्या 27,120 असून, 85 व अधिक वयोगटातील मतदारांची संख्या 38,349 आहेत. मतदार नोंदणीची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर आहे.