बॅलेटपेपर इतिहासजमा, निवडणूक ईव्हीएमवरच होणार! – सुनील अरोरा

1615

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी, बॅलेटपेपर इतिहासजमा झाले असून निवडणूक ईव्हीएमवर होईल हे स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी महाराष्ट्रातल्या काही पक्षांनी केली होती. मात्र बॅलेटपेपर इतिहासजमा झाले आहे. आता ईव्हीएमवरच निवडणूक घेण्यात येईल असे, सुनील अरोरा यांनी स्पष्ट केले. तसेच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, मात्र त्या मशीनसोबत छेडछाड होणं शक्य नाही, असेही ते म्हणाले. तसेच विरोधी पक्षांनी बोगस मतदारांबाबत तक्रारी केल्या असून त्याच्यावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांना विधानसभा किती टप्प्यात होईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी मिश्किलपणे ‘टीव्ही पाहा’, असे उत्तर दिले.

दरम्यान, विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घ्या अशी मागणी काही पक्षांनी केली आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी आलेल्या पुराचाही उल्लेख अरोरा यांनी पत्रकार परिषदेत केला. या भागातल्या लोकांना ज्या संकटाचा सामना करावा लागला त्याची निवडणूक आयोगाला कल्पना आहे असंही अरोरा यांनी स्पष्ट केले. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस, जिल्हाधिकारी, केंद्रीय संस्था यांच्यासोबत बैठक झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महत्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही लावले जातील, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या