विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून, महायुती सरकारची परीक्षा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीचा दारूण पराभव केला. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकत महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशाने महाविकास आघाडीत शिवसेनेसह ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन होत असल्याने सत्ताधारी महायुतीसाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे.

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 27 जूनपासून सुरू होत आहे. विधिमंडळाचे अधिवेशन हे 10 जूनपासून सुरू होणार होते. पण हे अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. आता विधिमंडळाचे हे अधिवेशन येत्या जून 27 पासून सुरू होत असून राज्यपाल रमैश बैस यांनी त्याची अधिसूचनाही जारी केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचे हे पावसाळी अधिवेशन होत आहे. तसेच विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची निवडणूक होत आहे. खास करून लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्याने महाविकास आघाडीची बाजू भक्कम झाली आहे. यामुळे विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटा यांच्या महायुतीची कोंडी होणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मराठा आरक्षणाचा मुद्दा, निधीवाटपात केंद्राकडून महाराष्ट्रासोबत होत असलेला दुजाभाव यासह महाराष्ट्राबाहेर जात असलेले उद्योग अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यांवर सत्ताधारी महायुती सरकार अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.