
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आणि दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांनी आज संयुक्त कारवाई केली. खडवली आणि कुर्ला येथे कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. ते दोघे काही घातपाती कृत्य करणार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्या दोघांकडून पोलिसांनी गुन्हेगारी स्वरूपाची कागदपत्रे, मोबाईलफोनसह काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. त्या दोघांना दिल्ली स्पेशल सेलच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कट्टरतावादी दहशतवादी गटाशी संबंधित असलेले काही जण घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली. त्या माहितीनंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आणि दिल्ली स्पेशल सेलने कुर्ला आणि खडवली येथे छापे टाकून दोघांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले ते दोघे ओडिशा येथून चालवल्या जाणाऱया एका गटाचे भाग होते. त्या दोघांना ऑनलाईन कट्टरतावादी केले गेले होते.
दोन्ही संशयितांना अधिक चौकशीसाठी दिल्लीमध्ये नेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुन्हेगारी कारस्थानाचा गुन्हा दाखल केला आहे.





























































