भाजपामुळे महाराष्ट्रात पेच आणि अस्थिरता!

900
bjp-logo

विधानसभेचा निकाल लागून 14 दिवस उलटले तरी सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. गेली विधानसभा 10 नोव्हेंबरला अस्तित्वात आली होती. त्यामुळे यावेळी शनिवार, 9 नोव्हेंबर मध्यरात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत सत्तास्थापनेचा दावा दाखल व्हायला हवा नाहीतर सत्तास्थापनेचा पेच आणखीनच गंभीर होऊ शकतो. राज्याच्या राजकारणाचा प्रवास सत्तास्थापनेच्या पेचापासून घटनात्मक पेचाकडे जाऊ शकतो. सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेते आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटले आणि हात हलवत बाहेर आले. त्यामुळे भाजप सत्तास्थापनेचा ‘‘दावा’ करणार ही फक्त ‘हवा’ होती आणि तेवढाच ‘‘कावा’ होता हे सिद्ध झाले. सर्वात जास्त मिरवणाऱया भाजपने एव्हाना सत्तास्थापनेचा दावा करणे क्रमप्राप्त होते पण आज अखेरपर्यंत तसे घडलेले नाही. परिणामी भाजपामुळेच महाराष्ट्रात पेच आणि अस्थिरता निर्माण झाली आहे अशी चर्चा आता सर्वच राजकीय पक्षांबरोबर राज्यातील जनताही करू लागली आहे. आता राष्ट्रपती राजवटीपासून बचावासाठी महाराष्ट्राकडे फक्त एकच दिवस उरला आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस उद्या राज्यपालांना भेटून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी काम पहावे असे राज्यपाल सांगतील. त्यामुळे उद्याचा दिवस राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचा दिवस ठरणार आहे, हे नक्की!

काय घडले…

शिवसेना आमदार ‘मातोश्री’वर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना आमदारांची बैठक बोलवली होती. बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आमदारांची मते जाणून घेतानाच त्यांना मार्गदर्शनही केले.

भाजपचे नेते ‘वर्षा’ आणि राजभवनवर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी सकाळीच ‘वर्षा’ निवासस्थानी भाजपच्या नेत्यांना पाचारण केले आणि त्यांच्याशी मॅरेथॉन चर्चा केली. त्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने आज राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

राज्यपालांची ऍटर्नी जनरलशी चर्चा

सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. त्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे ऍटर्नी जनरल आशुतोष कुंभकोनी यांच्याशी सल्लामसलत केली.

साताऱयाहून कोकणात निघालेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौरा अर्धवट सोडला आणि ते रात्री मुंबईत दाखल झाले. काँग्रेसच्या गोटातही हालचाली सुरू झाल्या असून सायंकाळी उशिरा सर्व आमदारांना हॉट लाइनवर फोन गेले आणि शुक्रवारी मुंबईत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या