महाविकास आघाडीच्या आमदारांना सभागृहात उपस्थिती सक्तीची

594

महाराष्ट्र विकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी दररोज सभागृहात हजर राहायलाच हवे असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिले. अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे सरकारचा चेहरा आहे. हा खरा चेहरा महाराष्ट्रातील जनतेला दिसायला पाहिजे. हे सरकार टिकणारच. त्याची चिंता तुम्ही करू नका असे मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांसमोर स्पष्ट केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक विधान भवनात बोलावण्यात आली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विरोधकांच्या गोंधळावरही या बैठकीत चर्चा झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी रोज हजर राहणे महत्त्वाचे आहे. विरोधकांना जशास तसे उत्तर देऊन जनतेला न्याय देण्याचा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सरकारला अडचण निर्माण होईल असे वक्तव्य महाविकास आघाडीच्या आमदारांनी करू नये अशी ताकीद यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे काँग्रेसच्या एका आमदाराने सांगितले. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये कोणतेही मतभेद नकोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे महाविकास आघाडीचा खरा चेहरा आहे. हा खर चेहरा लोकांना दिसायला पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याचे या काँग्रेसच्या या आमदाराने सांगितले.

लोकांचे प्रश्न सोडवा!

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीदेखील महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व आमदारांना विधानसभेत हजर रहा, चर्चेत सहभागी व्हा, आपले प्रश्न मांडा, जनतेचे प्रश्न सोडवा. लोकांना महाविकास आघाडीकडून हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक महिला दिन

दरम्यान 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने 5 मार्चला सभागृहात महिलांवरील विविध विषयांवर सभागृहात चर्चा होणार असून महिलांवरील अत्याचार तसेच इतर घटना यावरदेखील विस्तृत चर्चा होणार असून महिलांनादेखील न्याय देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सभागृहातदेखील सर्वाधिक महिला आमदारांना यावेळी बोलण्याची संधी देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विधान परिषद सभागृहनेतेपदी अजित पवार

विधान परिषदेच्या सभागृहनेतेपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली आहे. याबाबतची घोषणा सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच केली. याआधी ही जबाबदारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे होती, असे सभापतींनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या