‘प्राडा’सोबत चर्चा करून कारागिरांचे हित जपा! महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची भूमिका

जागतिक फॅशन ब्रँड प्राडाने एका फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पलचे डिझाइन वापरल्याच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने याबाबत मध्यममार्गी भूमिका घेतली आहे. कारागिरांचे हित डोळ्यासमोर ठेवून प्राडासोबत सहकार्य करायला हवे, असे मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केले आहे.

हिंदुस्थान सरकारच्या वाणिज्य खात्यातर्फे नवी दिल्लीत नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. हिंदुस्थानच्या पारंपरिक कला, कौशल्य आणि हस्तकलांचा गैरवापर रोखण्याविषयी बैठकीत चर्चा झाली. बौद्धिक संपदा हक्कांबाबत व्यापक प्रबोधन व जागरुकता गरजेची असल्याचे मत वाणिज्य मंत्रालयातील सचिव हिमानी पांडे यांनी व्यक्त केले. लिडकॉम आणि लिडकरने प्राडाविरुद्ध कायदेशीर कारवाईची भूमिका घेतली. तर, कायदेशीर कारवाईतून कारागिरांना प्रत्यक्ष लाभ होणार नाही, उलट प्राडा सोबत सहकार्याने बाजारपेठ उभारणी व थेट खरेदीची संधी मिळेल, अशी भूमिका गांधी यांनी मांडली. सध्याच्या जीआय कायद्यात आवश्यक सुधारणा करून कारागिरांचे हक्क अधिक बळकट करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.