महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 2 लाख पार, एकाच दिवसात 7 हजार नवीन रुग्ण

810

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 2 लाख पार गेली आहे. एकाच दिवसात कोरोनाच्या 7 हजार नवीन रुग्णांचा उच्चांक झाला आहे. 7073 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सध्या 83 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 3395 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत बरे झालेल्या 1 लाख 8 हजार 82 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 54 टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 64 इतकी झाली आहे. आतापर्यंत 8671 जणांचा मृत्यू झाला आहे. आज कोरोनाच्या 295 मृत्यूंची नोंद करण्यात आली असून यापैकी 124 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत. उर्वरित 171 मृत्यू हे त्या आधीच्या काळातील आहेत.

मुंबईत 1180 नवे रुग्ण, 68 मृत्यू

मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1180 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 68 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1 हजार 71 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 53 हजार 463 वर पोहोचली आहे. मुंबईतील गेल्या 48 तासांत 68 जणांचा मृत्यू झाला असून मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 4 हजार 827 झाली आहे. 51 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते.

धारावीत दोन रुग्ण
धारावीत आज केवळ दोन कोरोना रुग्ण सापडले आहेत. धारावीत सध्या 2311 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यातील 1704 कोरोनामुक्त झाले आहेत तर केवळ 519 सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसांत धारावीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. त्यामुळे धारावीतील दोन कोरोना सेंटर बंद करण्यात आली आहेत. लवकरच हा आकडा शून्यावर आणू, असा विश्वास साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी बोलून दाखवला.

आपली प्रतिक्रिया द्या