
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची (एमसीए) निवडणूक गतवर्षीप्रमाणेच यंदाही वादग्रस्त ठरणार अशी चिन्हे आहे. कारण निवडणूक प्रक्रिया जाहीर होताच सत्ताधारी व विरोधक यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. ‘एमसीए’ची निवडणूक ही पूर्णतः बेकायदा असल्याचा दावा विरोधी गटाने केला आहे. या निवडणूक प्रक्रियेत स्वतः निवडणूक अधिकारी जे. एस. सहारिया हेच पक्षपाती वागत असल्याचे आरोप विरोधकांनी केला आहे.
एमसीएच्या गहुंजे येथील स्टेडियमवर येत्या 8 जानेवारीला ही बहुचर्चित निवडणूक होणार आहे. ही निवडणूक पूर्णतः घटनाबाह्य असल्याचा आरोप माजी रणजीपटू अनिल वाल्हेकर, माधव रानडे व ऍड. कमल सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. ‘एमसीएच्या घटनेला धर्मादाय आयुक्तालयाची अद्याप मान्यता नाही. एमसीएच्या एसजीएममध्ये मान्य केलेल्या घटनेला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता असल्याचा कुठेही उल्लेख नाही. खऱया संघटनेला डावलून जालना क्रिकेट असोसिएशनला खोटया रजिस्ट्रेशनद्वारे मान्यता दिली, हे मुद्दे विरोधी गटाने निणडणूक अधिकारी जे. एस. सहारिया यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तरे न देता आमचे मुद्दे धुडकावून लावले, असा आरोप विरोधी गटाने केला. महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव तसेच माजी निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी असे पक्षपाती वागायला नको होते, असेही विरोधी गटाने म्हटले आहे.
‘एमसीएच्या घटनेबद्दलच्या विजयावर संबंधित संघटनेचे पदाधिकारीच भाष्य करू शकतील. एमसीएने माझ्याकडे जी कागदपत्रे सादर केली त्या आधारानुसार मी निवडणूक प्रक्रिया राबवत आहे. मी ती सर्व कागदपत्रे तपासली आहेत.’
n जे. एस. सहारिया (निवडणूक अधिकारी)



























































