युती आणि आघाडय़ा असल्या तरी…ठिकठिकाणी फडकली बंडाची निशाणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुठे जागावाटपात मतदारसंघ सुटला नाही म्हणून तर कुठे पक्षाने उमेदवारी दिली नसल्याने नाराज होत सर्वपक्षीय उमेदवारांनी ठिकठिकाणी बंडाचे निशाण फडकावले आहे. युती आणि आघाडी झालेली असतानाही भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाराजांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.

बंडखोरी टाळण्यासाठी युती व आघाडीचे जागावाटप जाहीर न करताच थेट उमेदवारांची घोषणा राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांकडून करण्यात आली. भाजपने बाहेरून आलेल्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने अनेक जण नाराज झाले असून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत स्वपक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. तर काही ठिकाणी महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघावर दावा सांगत भाजप कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केले आहेत.

काँग्रेसमध्ये नाराजीनाटय़

उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसने माजी मंत्री व पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. येथील चार नगरसेवक, तीन ब्लॉक अध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्षांकडे पाठवले आहे. तर मुंबई काँग्रेसच्या तिकीट वाटपात अन्याय झाल्याचे सांगत माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी थेट पक्ष सोडण्याची धमकी दिल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

शिवसेना विरुद्ध भाजप

  • सावंतवाडी  – राजन तेली
  • कागल -समरजीत घाडगे
  • कल्याण प. – नरेंद्र पवार
  • उरण – महेश बालदी
  • बोईसर – संतोष जनाठे
  • खेड-दापोली – केदार साठे
  • चिपळूण – तुषार खेतल
  • गुहागर – विनय नातू
  • पिंपरी – अमित गोरखे
  • माढा – मिनलताई साठे
  • वैजापूर – एकनाथ जाधव

भाजप विरुद्ध भाजप

  • कणकवली – संदेश पारकर
  • मीरा-भाईंदर – गीता जैन
  • मावळ – रवींद्र भेगडे
  • अहमदपूर – दिलीप देशमुख
  • आष्टी-पाटोदा – जयदत्त धस

भाजप विरुद्ध शिवसेना

  • पेण – नरेश गावंड
  • रामटेक – आशीष जैस्वाल
  • पंढरपूर  – शैला गोडसे
  • गेवराई – बदामराव पंडीत
  • कसबा – विशाल धनवडे

भाजपमध्ये अस्वस्थता

पहिल्या यादीत सुधाकर कोहळे व राजू तोडसाम या दोन विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहेत. त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत, तर गोंदियात विनोद अग्रवाल वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे. लातूरमधील औसा येथून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्याने पालक मंत्री निलंगेकर-पाटील नाराज आहेत.