अनुकंपाच्या 10 हजार जागा अखेर भरणार

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील चतुर्थ श्रेणीतील तब्बल दहा हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना गणपती बाप्पा पावला आहे.

राज्यातील शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये काम करताना एखाद्या कर्मचाऱयाचे निधन झाले तर कुटुंबातील वारसाला त्या विभागात नोकरी देण्याची तरतूद अनुकंपा तत्त्वावर आहे. अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचे धोरण 1973 पासून आहे,

पण गेल्या अनेक वर्षांपासून अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती झालेली नव्हती. सरकारी कर्मचारी संघटनांनी या भरतीसाठी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा केला होता. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीपत्र सादर केले होते. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्यात चतुर्थ श्रेणीच्या सुमारे 9 हजार 658 जागा रिक्त आहेत. या सर्व जागा पुढील काही दिवसांत भरल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली 15 तारखेपासून भरतीला सुरुवात होईल.

सात हजार लिपिकांची भरती

लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सात हजार लिपिकांचीही भरती करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. यामध्ये पंचायत राज, जिल्हा परिषदा, महानगर पालिका ग्रामीण विकास व शहरी विकास संस्थासह विविध विभागांचा समावेश आहे.

निम्मी भरती महापालिकेत

अनुकंपा तत्त्वावरील सुमारे 5 हजार 228 पदे महापालिकांमधील आहे. जिल्हा परिषदांमध्ये 3 हजार 705, नगर पालिकांमधील 725 पदे आहेत. नांदेड जिह्यात सर्वाधिक म्हणजे 506 उमेदवार आहेत. पुण्यात 348, गडचिरोलीत 322 व नागपूरमध्ये 320 पदे भरण्यात येणार आहेत.