हॉटेल, रेस्टॉरंटही लवकरच उघडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हॉटेल व्यावसायिकांना दिलासा

896
फोटो प्रातिनिधीक

मिशन बिगिन अगेनमध्ये राज्यातील उद्योगांना चालना देण्यात आली. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायात मोठे स्थान असलेला हॉटेल उद्योगही सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. यासाठीची कार्यपद्धती तयार करण्यात आली असून ती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट लवकरच सुरू करण्याचा विचार असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल व्यावसायिकांना आज दिलासा दिला.

राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱयांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना युद्धात सरकारसोबत राहिल्याबद्दल हॉटेल व्यावसायिकांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री म्हणाले, हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यांगत, प्रवासी निरोगी असेल; यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल कारण एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आता आता आपण सलूनला परवानगी दिली आहे ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. यावेळी या बैठकीत मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.

नियमांचे पालन करावे लागणार

हॉटेल्स सुरु करायला काही अडचण नाही मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे. आज स्थानिक जे कामगार , कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.

असोसिएशनच्या मागण्या

  • वीज देयके कमी करावीत.
  • हॉटेल्सना औद्योगिक दरात पाणी आणि वीज उपलब्ध करून द्यावे
  • हॉटेल्स आणि रेस्टोंरंटच्या खुल्या जागेत व्यक्तींच्या संख्येवर कमीतकमी मर्यादा असावी अन्यथा उत्पन्न आणि कर मिळणार नाही.
  • हॉटेल्स आणि रेस्टोंरंटबाबत वेळेची मर्यादा वाढवून द्यावी.

सुरक्षित अंतर ठेवून परवानगी द्यावी – हॉटेल्स असोसिएशन

या उद्योगाला आता खेळते भांडवल आवश्यक आहे. सर्वत्र नोकर्या जात आहेत मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱयांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत. काही प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टोंरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरू करायला परवानगी द्यावी अन्य राज्यांच्या तुलनेत पर्यटकांनी जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहावे जेणेकरून पर्यटन उद्योगाला वाव मिळेल, अशी अपेक्षा इंडियन हॉटेल्स असोसिएशनचे गुरुबक्ष सिंग कोहली यांनी व्यक्त केली.

टप्प्याटप्प्याने सुरू करणार – मुख्य सचिव

मुख्य सचिव संजय कुमार म्हणाले की, हॉटेल्स 100 टक्के लगेच सुरू करता येणार नाही पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरु करण्याचे नियोजन आम्ही करतो आहोत. प्रधान सल्लागार अजोय मेहता यांनी हॉटेल्स सुरु करतांना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्समध्ये मोठया प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक ठिकाणी सरकारला या नियमांची पूर्तता होते किंवा नाही हे पाहणे शक्य होणार नाही यासाठी स्वयंशिस्त ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कोरोनानंतर हॉटेल उद्योग जोमाने उभा राहायला हवा – आदित्य ठाकरे

पर्यटन व्यवसाय हा राज्याच्या विकासाला उत्तेजन देऊ शकतो. पर्यटनात हॉटेल उद्योगाला अत्यंत महत्त्व आहे. मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर व अन्य मोठय़ा शहरांत सर्व व्यवहार सुरू करताना भविष्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली कोरोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वतःला नियम घालणे महत्वाचे आहे, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या