
सब भूमी ‘अदानी’की असेच धोरण महायुती सरकारने अवलंबले आहे. महायुती सरकारचे मालक असलेल्या अदानींवर महाराष्ट्रातील जमिनींची खैरात केली जात आहे. पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीतील 600 एकर जमीन अदानींना दिल्यानंतर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) तळोजा उद्योग क्षेत्रातील 400 एकर जागा अदानींना देण्यात आल्याची माहिती आहे. एमआयडीसीने स्वतः विकसित करण्याऐवजी ही जमीन अदानींना दिली जात असल्याने संशय निर्माण झाला असून अदानींना या जमिनीतून शेकडो कोटींचा फायदा होणार आहे.
तळोजा उद्योग क्षेत्रात एमआयडीसीने जमीन विकसित केली तर तिथे मोठय़ा प्रमाणात उद्योग येऊन हजारो बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. परंतु आता मिळालेल्या जमिनीवर अदानींची कंपनी डाटा सेंटर आणि इतर पायाभूत सुविधा उभारणार असल्याची माहिती आहे. त्यातून रोजगार निर्मितीपेक्षा अदानींनाच अधिक फायदा होणार आहे.
n तळोजा एमआयडीसीत जमिनीचा दर 15,460 रुपये प्रति चौरस मीटर आहे. 400 एकर जमिनीची एपूण किंमत 2460 कोटी रुपये आहे. अदानींच्या कंपनीला याच दराने ही जमीन दिली गेल्याचा दावा केला जात आहे.