प्रभाग रचना 17 जूनपासून, 18 ऑगस्टला अंतिम आराखडा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्य शासनाने महानगरपालिका आणि नगर परिषदांना दिले असून आज त्याचा तारीखनिहाय कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार प्रभाग रचनेच्या कामाला 17 जूनपासून सुरुवात होणार असून 19 जूनपासून प्रभागांच्या हद्द निश्चितीचे काम केले जाणार आहे. त्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही पूर्ण करून 18 ऑगस्टपर्यंत प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा निवडणूक आयोगाला पुढील मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. या कालबध्द कार्यक्रमानुसारच संबंधित अधिकाऱयांनी प्रभाग रचनेचे काम पूर्ण करावे, निवडणुका वेळेवर घ्याव्यात, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असल्याने या मुदतीत कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबईसह अ, ब, क वर्गातील महापालिकांसाठी कार्यक्रम

– जनगणनेची माहिती तपासणे – 17 ते 18 जून n स्थळ पाहणी – 19 ते 23 जून n गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे – 24 ते 30 जून n नकाशावरील प्रभाग हद्दींची प्रत्यक्ष तपासणी – 1 जुलै ते 3 जुलै n प्रभाग रचनेच्या प्रारुपावर समितीच्या स्वाक्षऱया – 4 जुलै ते 7 जुलै n प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणे – 8 ते 10 जुलै n प्रभाग रचना प्रसिद्ध करून हरकती मागवणे – 22 जुलै ते 31 जुलै n हरकती व सूचनांवर सुनावणी – 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट n अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाला पाठवणे – 12 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट n आयोगाने अंतिम केलेली प्रभाग रचना प्रसिद्ध करणे – 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर

– ड वर्ग श्रेणीतील महापालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींसाठी प्रभाग रचनेचे काम 17 जूनपासून सुरू होणार असून 7 ऑगस्टपर्यंत प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा आयोगाला पाठवावा लागणार आहे. त्याला मंजुरी मिळाली की 1 सप्टेंबरपर्यंत ती प्रभाग रचना प्रसिद्ध करावी लागेल.