मुंबईतील आरे दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री बंद असलेले स्टॉल राज्य सरकारने महानंद दुग्धशाळेला हस्तांतरित करण्याचे योजले आहे. त्यामुळे महानंदच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीमध्ये वाढ होईल, अशी राज्य सरकारला अपेक्षा आहे, मात्र हे करताना आरे केंद्रचालक आणि त्यावर काम करणाऱ्या अर्धवेळ कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेने राज्य सरकारकडे केली आहे.
दुग्ध व्यवसाय विकास आयुक्तांच्या वतीने प्रभारी व्यवस्थापक गजानन राऊत यांच्याबरोबर नुकतीच महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे पदाधिकारी तसेच लेखा अधिकारी व वितरण अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आरे केंद्रधारकांच्या महत्त्वाच्या व प्रलंबित विषयावर चर्चा झाली. त्यावेळी ही मागणी करण्यात आली.
कोणत्याही परिस्थितीत 40 ते 50 वर्षांपासून अर्धवेळ कर्मचारी असलेले आरे केंद्रधारक यांच्या हिताला, उपजीविकेच्या एकमेव साधनाला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये, असा कोणता निर्णय प्रशासनाने घेताना संघटनेशी चर्चा करावी आणि केंद्रचालक आणि कर्मचाऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र दूध वितरक सेनेचे कार्याध्यक्ष राम कदम यांनी केली.
दरम्यान, याबाबत प्रशासन, लेखा विभाग व वितरण विभागाने एक महिन्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. बैठकीला सहकार्यध्यक्ष आदिनाथ हिरवे, उपाध्यक्ष सुहास शिवडवकर, चंद्रकांत झगडे, तानाजी आरज, सरचिटणीस सतीश सावंत, कोषाध्यक्ष विलास भुजबळ, सचिव अनिल दळवी, रवींद्र पास्टे, रेखा संखे आदी उपस्थित होते.