निगेटिव्ह रिपोर्ट आणा, तरच मुंबई-महाराष्ट्रात प्रवेश मिळणार!

कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज झाले आहे. परराज्यांतून येणाऱया प्रवाशांच्या माध्यमातून कोरोना संसर्ग पसरू नये यासाठी कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. यापुढे दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थानातून येणाऱया प्रवाशांना कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरच महाराष्ट्रात प्रवेश मिळणार आहे. विमान, रस्ते, रेल्वे यापैकी कोणत्याही मार्गाने या चार राज्यांतून येणाऱया प्रवाशांसाठी 25 नोव्हेंबरपासून हे निर्बंध लागू होणार आहेत.

दिवाळीनंतर महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाचा हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारकडून मिशन बिगिन अगेनअंतर्गत नवीन मार्गदर्शक तत्त्वे आज जारी करण्यात आली. यानुसार गोवा, दिल्ली, राजस्थान, गुजरातमधून येणार्या प्रवाशांना कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत घेऊनच महाराष्ट्रात दाखल होता येणार आहे.

विमानतळावरही प्रवाशांसाठी कोरोना चाचणीची सुविधा शुल्क आकारून उपलब्ध करून देता येणार आहे.

विमानतळावर निगेटिव्ह रिपोर्ट, संपर्क क्रमांक, पत्ता याची नोंद करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वेतून किंवा विमानातून येणाऱ्या प्रवाशांचे शरीराचे तापमान तसेच कोरोनाची लक्षणे आहेत का याची तपासणी केली जाणार आहे.

जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळतील त्यांना कोरोना उपचार केंद्रात दाखल केले जाणार आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीनुसार विमान प्रवाशांना 72 तास आधी तर रेल्वे प्रवाशांना 96 तास आधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे.

रस्त्याने प्रवास करणाऱया प्रवाशांचे शारीरिक तापमान तसेच कोरोनाची लक्षणे तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांना लक्षणे नसतील त्यांना प्रवेश देण्यात येईल. ज्यांच्यात लक्षणे आढळतील त्यांची अॅण्टीजेन टेस्ट करण्यात येईल.

रेल्वेने येणाऱया प्रवाशांनीही कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आणणे बंधनकारक आहे.

…तर पालिका कोरोना चाचणी करणार

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यातून मुंबई येणाऱया प्रवाशांनी विमानतळ, रेल्वे आणि रस्ते मार्गे येताना त्यांचा लेटेस्ट कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे. मात्र, काही कारणांमुळे कोरोना चाचणी केली नसेल तर चाचणीची व्यवस्था विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर करण्यात आलेली आहे. पालिकेचे पथक त्यासाठी तैनात ठेवण्यात आले आहे.

एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर नियमानुसार त्यांना कोरोना सेंटर किंवा रुग्णालयात दाखल करू किंवा घरी कोरेंटाईन करू. मात्र, रस्ते मार्गे येताना पालघर आणि नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर कोरोनाचा रिपोर्ट दाखवणे आवश्यक आहे तरच त्यांना प्रवेश देण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

बंद घरांसाठी पालिकेची विशेष मोहीम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील मजूर त्यांच्या मूळ गावी गेले होते. राज्य सरकारच्या माझे पुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेवेळी अशा शेकडो बंद घरे आढळली आहेत. अशा बंद घरांची यादी तयार करण्यात आली आहे. मात्र, आता हे मजूर, कामगार पुन्हा परतू लागले आहेत. कोरोनाचे संशयित शोधताना ज्यांची घरे बंद होती पण आता जे लोक परतले आहेत अशा लोकांची कोरोना तपासणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहितीही काकाणी यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या