बदलापूर शहरातील एका शाळेमध्ये 4 वर्षांच्या दोन चिमुरडींवर झालेल्या लैंगित अत्याचाराच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी शाळेच्या प्रशासनाची भूमिका आणि पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यात केलेली दिरंगाई यामुळे बदलापूरमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. बदलापूरमधील त्या शाळेसमोर पालकांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले. आंदोलक मागे हटण्यास तयार नसल्याने परिसरात तणाव वाढला आहे. त्यातच भाजप आमदार किसन कथोरे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आंदोलकांच्या संतापात आणखी भर पडली आहे.
आंदोलकांनी रेल रोको केल्यामुळे पाच सहा तासांपासून वाहातूक खोळंबली आहे. आंदोलक बदलापूर रेल्वे स्थानकावरील रुळांवर ठाण मांडून आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. या संतप्त प्रतिक्रियांमुळे बदलापूर रेल्वे स्थानकातील आंदोलन हा ठरवून केलेला राजकीय स्टंट आहे, असा दावा भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. त्यामुळे आंदोलकांचा संतापात भर पडली आहे.
या आंदोलनाबाबत किसन कथोरे म्हणाले की, सकाळी बदलापूरमधील आंदोलन अशाप्रकारे भरकटले. शाळेसमेर आंदोलन करणारे रेल्वे स्थानकात कसे घुसले. रेल्वे स्थानकात आंदोलक करणाऱ्यांपैकी अनेकजण बदलापूरचे रहिवासी नाहीत. ही सर्व बाहेरून आणलेली माणसे आहेत. आता शाळेतील वातावरण आता शांत होतं. त्यामुळे ही ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. बदलापूरकरांना आणि रेल्वे प्रवाशांना वेठीस धरलंय, रेल्वेला वेठीस धरलंय. हे योग्य नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कथोरे यांनी केले आहे. त्यानंतर सर्वांनी शांतता राखा, कुणीही या प्रकरणी राजकारण करू नका, असेही किसन कथोरे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणी नागरिकांनी संयम पाळला होता. मात्र, कुणीतरी चिथावणी दिली. याचे बॅनर रात्रीच तयार झाले आणि बदलापूरमध्ये लावण्यात आले. लाडकी बहीण योजनेचा लाभ नको, न्याय द्या म्हणून. हे बॅनर उल्हासनगर आणि बाहेरून आणण्यात आले. हे कोणीतरी ठरवून केलेलं आहे, असे मी सांगू शकतो, असेही कथोरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने आंदोलकांचा संताप आणखी वाढला आहे.