एका क्लिकवर मिळणार आरोपीची कुंडली

25

आशिष बनसोडे, मुंबई

आरोपीची फिंगर प्रिंट घेण्याची कालबाह्य पद्धत आता बंद होणार आहे. यापुढे पोलीस केवळ फिंगर प्रिंटच नव्हे तर आरोपीचे डोळे, चेहरा आणि हाताच्या तळव्यांचे डिजिटल पद्धतीने स्कॅनिंग करून गुह्याचा तपास करणार आहेत. यासाठी पोलिसांनी ‘ऑटोमॅटिक मल्टीमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम’ विकसित केली आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे राज्यात कुठल्याही पोलीस ठाण्यात बसून एका क्लिकवर आरोपीची कुंडली मिळवता येणे सहज शक्य आहे. या सिस्टममुळे पोलिसांचे काम अधिक सोपे व गतीशील होणार आहे.

आरोपीची फिंगर प्रिंट हा पोलिसांसाठी महत्त्वाचा दस्ताऐवज असतो. पूर्वी कागदावर फिंगर प्रिंट घेतल्या जायच्या. पण ती पद्धत कालबाह्य ठरली असून महाराष्ट्र सायबर पोलिसांनी आरोपीची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असणारे फिंगर प्रिंट डिजिटल पद्धतीने घ्यायचे ठरवले आहे. बोटांच्या ठशांबरोबरच आता आरोपीचे डोळे, चेहरा आणि तळव्याचेदेखील नमुने घेणार आहेत.

१२०० पोलीस ठाण्यात सुविधा

राज्यातील १२०० पोलीस ठाण्यांना ही सिस्टम  असलेले संगणक देण्यात येणार असून त्या संगणकावर केवळ आरोपींचे डोळे, चेहरा, बोट आणि हाताचे तळव्याचेच नमुने घेतले जाणार आहेत. सध्या १२ प्रशिक्षण केंद्रांमध्ये अंमलदार ते पोलीस निरीक्षक यांना या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. स्मार्टचिप या फ्रान्सच्या कंपनीच्या मदतीने महाराष्ट्र पोलीस हा प्रोजेक्ट राबवत आहेत. ५४ कोटींचे बजेट असलेल्या या प्रोजेक्टचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

‘सीसीटीएनएस’शी कनेक्ट करणार

एखाद्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला की त्याची माहिती देशांतील प्रत्येक पोलीस ठाण्याला कळावी यासाठी सरकारने ‘सीसीटीएनएस’ ही प्रणाली सुरू केली. या प्रणालीमुळे देशांतील कुठल्याही आरोपीची माहिती केवळ एका क्लिकवरती उपलब्ध होते. त्यामुळे ऑटोमॅटिक मल्टीमॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम सीसीटीएनएसला कनेक्ट करणार आहे. परिणामी आरोपीची ओळख पटविण्याबरोबर त्याच्या विरोधात भक्कम पुरावे सादर करण्यास मोठी मदत होणार आहे. 

डॉ. बालसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक

जुन्या पारंपरिक पद्धतीने होणार्‍या कामकाजाला छेद देत आता महाराष्ट्र पोलीसदेखील आधुनिक पद्धतीने आरोपींची इत्यंभूत माहिती संकलन करणार आहेत. यामुळे कुठल्याही आरोपीची आवश्यक माहिती कुठल्याही पोलीस ठाण्यात बसून केवळ एका क्लिकवर घेणे सहज शक्य होणार आहे. लवकरच या नव्या प्रणालीनुसार प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात होईल.

  • मुंबईत असणार मुख्य केंद्र महाराष्ट्र पोलीस एफबीआयच्या एक पाऊल पुढे
  • एफबीआयकडे केवळ फिंगर आणि तळव्यांचे स्कॅनिंग करण्याची सुविधा
  • आंध्र आणि कर्नाटक पोलिसांकडेही फिंगर प्रिन्ट सुविधा
  • महाराष्टात २०१२ पासून जुनी यंत्रणा ठप्प
  • नवीन सिस्टमनुसार जुन्या साडेसहा लाख फिंगर प्रिन्टचे डिजिटलायजेशन
आपली प्रतिक्रिया द्या