राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापत आहे. यावरून मनोज जरांगे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तर ओबीसी नेतेही त्यांच्या आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे मत व्यक्त केले होते. त्यावरून पुन्हा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. या मुद्द्यावर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.
धाराशिवमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले आहेत. त्यांनी हॉटेलमध्ये ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली आहे. राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये आंदोलकांनी ठिय्या मांडलाय. राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे, या दौऱ्यासाठी ते धाराशिवमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबले आहेत. यावेळी मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. मनोज जरांगे पाटील तुम्ही आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी जोरदार घोषणाबाजीही आंदोलकांनी केली आहे.
राज ठाकरे धाराशिवमधील पुष्पकपार्क या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. मराठा समाजाचे कार्यकर्ते अचानकपणे हॉटेलमध्ये शिर. या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंकडे भेटीसाठीची वेळ मागितली होती. मात्र, राज ठाकरेंनी ती नाकारली. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हॉटेल परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. राज ठाकरेंच्या दौऱ्याला 4 ऑगस्ट पासून सुरवात झाली आहे. हा दौरा 13 ऑगस्ट पर्यंत हा दौरा सुरू असणार आहे.