टोपपदरी, इरकल

> शिवानी गोंडाळ (मेकअप आर्टिस्ट)

महाराष्ट्रातील इरकल ही साडी महिलांची अत्यंत आवडती अशी साडी असून सध्या या साडीच्या बॉर्डरमुळे, रंगांमुळे ती अनेक कार्यक्रमांची राणी बनली आहे. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली ही साडी मूळची कर्नाटकची असून कर्नाटकात या साडीला ‘इलकल’ म्हणतात. योग्य प्रकारे मेकअप, ज्वेलरी, हेअरस्टाइल करून या साडीचा एकंदरीतच सौंदर्य व रुबाब खुलवू शकता.

असे निवडा दागिने
ट्रडिशनल लूकसाठी सोन्याचे, मोत्याचे तसेच ऑक्साईड ज्वेलरी तुम्ही या साडीवर वापरा. कुंदन ज्वेलरीचाही वापर केल्यास तोही छान दिसतो. तुम्हाला अगदीच मॉडल स्टायलिश लूक हवा असल्यास तुम्ही स्टोन नेकलेस, फॅब्रिक ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी किंवा टेराकोटा ज्वेलरी घाला. या साडीवर नथ फार छान दिसते. त्यामुळे तुम्ही मोठी किंवा छोटी अशा वेगवेगळय़ा नथी किंवा नोज पिन घालू शकता. मात्र या साडीवर प्लेन टिकल्या, जास्तीत जास्त लाल किंवा
चॉकलेटी रंगाच्या टिकल्या किंवा चंद्रकोर लावली तर ती जास्त उठून दिसेल.

कर्नाटकातील बागलकोट जिह्यात इलकल आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात हातमागावर विणल्या जाणाऱया या साडय़ांची खासीयत म्हणजे मुख्य साडी आणि साडीचा पदर वेगवेगळा विणला जातो आणि ‘कोंडी’ नावाचे खास टेक्निक वापरून पदर मुख्य साडीला जोडला जातो. या साडीचा पदर एका विशिष्ट पद्धतीचा असतो. लाल-पांढरा किंवा मरून-पांढऱया रंगांचे पट्टे या पदरावर असतात. या पदराला टोप पदर म्हणतात. हल्ली मात्र दुसरेही रंग इरकलच्या पदरावर झळकताना दिसतात. त्यावर सुंदर पारंपरिक गोंडे असतात.

इरकल साडय़ांचे काठ नेहमी कॉन्ट्रास्ट असून चार ते सहा इंच रुंदीचे असतात. काठाच्या डिझाइनमध्ये पण काही सुंदर पारंपरिक प्रकार आहेत. उदाहरणार्थ चिक्की-पारस, गुमी, जरी, गायत्री इत्यादी. यातील चिक्की-पारस काठ खूपच लोकप्रिय प्रकार आहे. हे सुंदर काठ उठून यावेत म्हणून मधली साडी प्लेन किंवा चेक्स (चौकडीची)असते.

ओरिजनल इरकल ओळखायची खुबी म्हणजे पदर साडीला जिथे जोडला जातो, तो भाग साडीच्या उलटय़ा बाजूने बघावा. इंटरलॉकिंग लूप पद्धतीने साडीचे उभे धागे (साडीचा ताना) आणि पदराचे उभे धागे (पदराचा ताना) एकमेकांना जोडलेले दिसतात. ज्याला कोंडी टेक्निक असेही म्हणतात. कर्नाटकात प्लेन इलकल साडीवर कसुटी नामक भरतकाम पण हाताने केले जाते. कसुटी म्हणजे कर्नाटकी ‘कशिदा.’ कापडाच्या दोन्ही बाजूने तंतोतंत सारख्या दिसणाऱया या कर्नाटकी ‘कशिदा’लाही जीआय टॅग मिळाला आहे.

प्लेन कॉटन इलकल साडी आणि कॉन्ट्रक्ट खणांचे ब्लाऊज सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. या साडीवर हाफ स्लीव्हज्चे ब्लाऊज घालू नका. त्यापेक्षा थोडा स्टायलिश लूक हवा असेल तर तुम्ही स्लीव्हलेस ब्लाऊज घाला. तसेच ट्रडिशनल लूक हवा असल्यास थ्री फोर्थ ब्लाऊज तुम्ही वापरू शकता.

मेकअप कसा कराल
या साडीवर मेकअप करताना तुम्ही दोन्ही प्रकारे मेकअप करू शकता. जसे की, या साडीवर तुम्ही हेवी फाऊंडेशनही लावू शकता. तसेच एकदम नॅचरल फाऊंडेशनही लावू शकता. मात्र तुम्ही तुमच्या डोळय़ांचा मेकअप मात्र विंग आयलाइनर किंवा डार्क काजळ घालून केला तर तो जास्त उठावदार दिसतो. या साडीवर तुम्ही लॅसेसचाही वापर करू शकता. तसेच लाइट किंवा डार्क असे दोन्ही प्रकारचे लिपस्टिक तुम्ही या साडीवर लावू शकता. या साडीवर तुम्ही हेअरस्टाइल करताना अंबाडा किंवा जुडा, त्यावर गजरा किंवा छोटी फुले यांचा वापर करा. केस लांब असल्यास तुम्ही ओपन हेअरस्टाइल करू शकता. सध्या प्रचलित असलेल्या वेगवेगळय़ा मेसी बन किंवा मेसी स्टाइल तुम्ही या साडीवर घालू शकता.

[email protected]