1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आज रत्नागिरीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने मोर्चा काढला. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची,कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय जात नाही अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या मोर्चाला मारूती मंदिर येथून सुरूवात झाली.जुन्या पेन्शनची मागणी करणारी विविध गाणी गात मोर्चा निघाला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोहचताच जोरदार घोषणा देण्यात आल्या.यावेळी मोर्चामध्ये विविध मागण्या मांडण्यात आल्या.त्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करा,अन्यायकारक शिक्षणसेवक पद रद्द करून नवीन शिक्षकांना नियमित वेतनश्रेणीचा लाभ द्या.आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या डिसीपीएस खात्यातील जमा रक्कमेवर व्याज मिळावे.शालेय शिक्षण विभागाच्या 15 मार्च 2024 रोजीच्या शासननिर्णयातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात.सर्व शिक्षकांना 10,20,30 वर्षातील आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी.शालेय शिक्षण विभागाच्या दि.21 जून 2023 च्या शासननिर्णयातील शिक्षक भरतीच्या जाचक अटी रद्द कराव्यात. बीएसओ म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात.नवभारत साक्षरता कार्यक्रमासह विविध अशैक्षणिक आणि ऑनलाइन कामाची सक्ती करण्यात येऊ नये.शिक्षकांना मुख्यालयी रहाण्याची अट शिथिल करावी.एम एस सीआयटीसाठी मुदत वाढवावी या मागण्या यावेळी करण्यात आल्या.