महाराष्ट्रात चार देशांपेक्षा जास्त साखर उत्पादन, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साखर उत्पादनात महाराष्ट्राने चीन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान या देशांपेक्षा आघाडी घेतली आहे. यंदा साखर उत्पादनात सांगली, कोल्हापूर जिल्हे सर्वांत पुढे आहेत. देशात साखर उत्पादनात मागील दोन ते तीन वर्षे उत्तर प्रदेश अग्रस्थानी होता, तर महाराष्ट्र दुसऱया स्थानी राहिला होता. हे चित्र चालू वर्षी बदलले असून, महाराष्ट्राने ऊसगाळप आणि साखर उत्पादनात उत्तर प्रदेशला मागे टाकत देशात प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

शेखर गायकवाड म्हणाले, महाराष्ट्रात 2021-22 च्या गाळप हंगामात आत्तापर्यंत 11 कोटी 12 लाख 34 हजार मेट्रिक टन ऊसगाळप, तर 11 कोटी 54 लाख 18 हजार क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. चालू वर्षी 10.38 टक्के साखर उतारा मिळाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 7 कोटी 68 लाख मेट्रिक टन ऊसगाळप, तर सुमारे 80 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले आहे. तर, महाराष्ट्राने 11 कोटी 12 लाख 34 हजार मेट्रिक टन ऊसगाळपातून 11 कोटी 54 लाख 18 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

महाराष्ट्राने उत्तर प्रदेशच्या तुलनेत सुमारे 35 लाख क्विंटलहून अधिक साखरेचे जादा उत्पादन घेतले आहे. तर, राज्यात गतवर्षीच्या तुलनेत 1 कोटी 57 लाख 32 हजार क्विंटल जादा साखरेचे उत्पादन घेतले आहे. चालूवर्षी हंगामअखेरही महाराष्ट्रच आघाडीवर राहील.

देशपातळीवर चालूवर्षी 3 कोटी 47 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 1 कोटी 25 लाख मेट्रिक टन राहील. तसेच, देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा वाढून तो जवळपास 39 टक्क्यांवर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

साखर उत्पादनात कोल्हापूर विभाग राज्यात अव्वल

साखर उत्पादनात देशात महाराष्ट्र प्रथम, तर राज्यात कोल्हापूर विभाग अग्रेसर आहे. महाराष्ट्राचे एकूण साखर उत्पादन 11 कोटी 54 लाख 18 हजार क्विंटल आहे. यामध्ये सांगली, कोल्हापूर जिह्याने 2 कोटी 88 लाख 79 हजार 712 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. महाराष्ट्रात साखरेचा सर्वाधिक म्हणजे 11.75 टक्के उतारा कोल्हापूर विभागात मिळाला आहे.

यंदाच्या गळीत हंगामात महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावरील 98, तर खासगी तत्त्वावरील 99 असे एकूण 197 साखर कारखाने सुरू झाले होते. यामध्ये कोल्हापूर विभागातील 36, पुणे विभागातील 29, सोलापूर विभागातील 46, नगर विभागातील 27, संभाजीनगर विभागातील 25, नांदेड 27, अमरावती 3 व नागपूर विभागातील 4 अशा साखर कारखान्यांचा समावेश आहे.

विभाग            ऊस गाळप                साखर उत्पादन
                     (मेट्रीक टनांत)                (क्विंटलमध्ये)

कोल्हापूर         2 कोटी 45 लाख 68 हजार 45       2 कोटी 88 लाख 79 हजार 712
सोलापूर          2 कोटी 61 लाख 9 हजार 274       2 कोटी 45 लाख 3 हजार 40
पुणे               2 कोटी 26 लाख 77 हजार 553     2 कोटी 40 लाख 86 हजार 745
नगर              1 कोटी 55 लाख 95 हजार 77       1 कोटी 54 लाख 77 हजार 485
नांदेड            1 कोटी 12 लाख 59 हजार 871      1 कोटी 17 लाख 84 हजार 525
संभाजीनगर      96 लाख 70 हजार 380                  95 लाख 9 हजार 190
अमरावती           8 लाख 9 हजार 460                   7 लाख 64 हजार 725
नागपूर              4 लाख 12 हजार 205                 3 लाख 56 हजार 760