टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी लेनची संख्या वाढवणार

160

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, ठाणे, दहिसर, ऐरोली, वाशी येथील टोलनाक्यांवरील वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी लेन वाढवण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिले.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्यातील सर्व उड्डाणपुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सुशोभीकरणात एकसूत्रता आणण्याची सूचनाही त्यांनी केली. एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी महामंडळामार्फत विकसित करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा यावेळी शिंदे यांनी घेतला.

रस्ते, पूल, उड्डाणपूल तयार करताना त्यांच्या सौंदर्यावर अधिक भर द्यावा, रस्त्यांच्या दुभाजकांवर झाडे लावावीत, शोभिवंत कुंडय़ा ठेवून त्यांची निगा राखावी, राज्यभरात महामंडळाच्या माध्यमातून जे उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत त्यांचा आढावा घेण्यात यावा, या पुलांची रंगरंगोटी, सुशोभीकरणावर भर देताना त्यात एकसूत्रता असावी, यासाठी अधिकारी नेमून त्याचा पाठपुरावा करण्यात यावा, रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत, खड्डे पडणार नाही याची दक्षताही घ्यावी, असे सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी सांगितले. उड्डाणपुलाखाली डेब्रिज, सामान राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पुलांखालचा भाग स्वच्छ आणि मोकळा राहावा यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के आदी यावेळी उपस्थित होते.

डेब्रिज काढा-रंगरंगोटी करा

कल्याण-शीळफाटा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा. रस्त्यांवर माती, डेब्रिज काढून टाका व रस्ते स्वच्छ आणि सुंदर करा. रस्त्यांच्या दुभाजकांवर असलेल्या कुंडय़ांना रंगरंगोटी करा, असे निर्देशही शिंदे यांनी केले. पावसाळ्यामध्ये पुलांवर खड्डे पडत असल्यामुळे अपघात होऊ शकतात अशा पुलांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

टोलनाक्यावरील गर्दी कमी करा

रस्त्यांच्या कामांमुळे राज्याच्या विकासात भर पडत असून नागरिकांची मोठी सोय होत आहे. मात्र टोलनाक्यांवर वाहनांच्या मोठय़ा प्रमाणावर रांगा दिसून येतात. नागरिकांना टोल देण्यासाठी तास-तासभर अडकून पडण्याची गरज नसल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. टोलनाक्यांवरील ही गर्दी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा, लेनची संख्या वाढवा, हॅण्डहेल्ड मशीनधारकांची संख्या वाढवावी. विशेषतः सुट्टीच्या दिवशी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, दहिसर, वाशी या टोलनाक्यांवर मोठी गर्दी होते, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या