देशभरातून आता मॉन्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्याप परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला नसल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. येत्या 15 तारखेनंतर राज्यातून मॉन्सूनच्या परतीचे चित्र स्प्ट होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. तोपर्यंत आठवडाभर राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
येत्या तीन दिवसात विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात गुरुवारी संध्याकाळी मुंबई उपगनरात दमदार पावसाने हजेरी लावली. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. येत्या आठवडाभर राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशातील पंजाब, हरयाणा, हिमालय, कच्छ, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातमधून मॉन्सून परतला असून अद्यार महाराष्ट्रातून त्याचा परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. राज्यातील परतीच्या पावसाचे चित्र 15 तारखेपर्यंत स्पष्ट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आठवड्याभरात दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.