महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री इशा डे लवकरच अडकणार लग्नबंधनात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री इशा डे लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून, एकापाठोपाठ एक अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. अशातच इशाने तिच्या लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. तिच्या या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Dey (@esha__dey)

इशाच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून, नुकताच तिचा ‘ग्रहमख’ विधी पार पडला. या विधीसाठी इशाने आकाशी रंगाची सुंदर साडी परिधान केली होती, ज्यात तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री सायली परब-शेलारने इशाच्या या विधींचे खास फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये सायली इशाच्या कपाळावर मुंडावळ्या बांधताना दिसत असून, या आनंदाच्या क्षणी इशाच्या चेहऱ्यावरचा उत्साह स्पष्टपणे जाणवत आहे.

दरम्यान, इशाने तिच्या लग्नाची बातमी शेअर केली असली तरी, तिचा होणारा पती कोण आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्रीने आपल्या जोडीदाराचे नाव सध्या गुलदस्त्यात ठेवल्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. इशाने ‘आश्रम 3’ ही वेब सीरिज, ‘गुलकंद’ चित्रपट आणि ‘सुखी माणसाचा सदरा’ यांसारख्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. आता ती वैयक्तिक आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली असून तिचे चाहते तिच्या लग्नाच्या अधिक अधिकृत फोटोंची वाट पाहत आहेत.